अकोला (Maharajswa Abhiyan) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा एक भाग म्हणून, पास्टूल येथे (Maharajswa Abhiyan) सेवा पंधरवाड्याअंतर्गत शेतरस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त (१७ सप्टेंबर) सुरू झालेल्या आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (२ ऑक्टोबर) चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत, दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी गावामध्ये शिवार फेरी काढण्यात आली.
या (Maharajswa Abhiyan) शिवार फेरीमध्ये गावातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते. गावातील नकाशावर असलेले पण प्रत्यक्ष वापरात नसलेले किंवा अतिक्रमण झालेले शेतरस्ते मोकळे करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. याच मोहिमेच्या पुढील टप्प्यात दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडून या रस्त्यांची मोजणी करण्यात आली. यावेळी भूमी अभिलेख अधिकारी श्री. पारधी, ग्राम महसूल अधिकारी श्री. डी. एम. डबेराव आणि महसूल सहायक उपस्थित होते. या मोजणीच्या कामात गावातील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.
तहसीलदार वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सुनील राऊत, ग्राम महसूल अधिकारी डी. एम. डबेराव, ग्रामपंचायत कर्मचारी आणि सर्व शेतकरी यांच्या सहकार्याने हे कार्य यशस्वीपणे पार पडले. या उपक्रमामुळे गावातील शेतजमिनींना योग्य रस्ते उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.




