परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शिर्शी बु. येथील घटना
ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
परभणी/सोनपेठ (Sonpeth Accident) : अॅपे अॅटो आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी मुलीला उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ जानेवारी रोजी उपचारा दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झाला. या (Sonpeth Accident) प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर ३ जानेवारी रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन ढवळे यांनी तक्रार दिली आहे. निधी ढवळे वय १३ वर्ष, असे मयत मुलीचे नाव आहे. ३० डिसेंबरच्या सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादी, त्यांच्या पत्नी, मुली आणि मेव्हणा हे एम.एच. २३ एच. ९८४१ या क्रमांकाच्या अॅपे अॅटोने जात होते. शिर्शी बु. गावाच्या पुढे पाठीमागुन आलेल्या एम.एच. २२ ए.एम. ४०६६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या हेडला अॅटोचा जोराचा धक्का लागला. यात (Sonpeth Accident) अॅटोतील इसम जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुढील उपचारासाठी परभणीला पाठविण्यात आले. अपघातात निधी ढवळे ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला परभणीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान २ जानेवारीला सदर मुलीचा मृत्यू झाला. तिच्या (Sonpeth Accident) अपघाती मृत्युस कारणीभुत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालक माणिक नरोजी खांडेकर याच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.