शेतकरी हवालदिल!
रिसोड (Soybean Price) : रिसोड शेतकरी आजही हवामानातील बदल आणि बाजारपेठेतील अस्थिरता अशा दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. विशेषतः अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याच्या बातम्या समोर आहेतच शेतकऱ्याचे अर्थचक्र ठरविणारे महत्त्वाचे सोयाबीन पीका चा हमीभाव मुद्दा घेऊन राजकीय फड तापवण्याच्या हालचाली राजकीय नेते, शेतकरी संघटनांकडून (Farmers Association) होत असून यातून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती पाहायला मिळत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोयाबीन दराच्या मुद्द्यावरून महायुतीला फटका बसला होता. हा संदर्भ लक्षात घेऊन आता आगामी पालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी हा मुद्दा राजकीयदृष्ट्या ऐरणीवर येऊ लागला आहे. सध्या सोयाबीनला बाजारात मिळत असलेल्या मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांचा मशागत खर्चसुद्धा वसूल होत नसताना व्यापारी कवडीमोल भावाने तो खरेदी करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता घटली!
सोयाबीन दर खरेदीसाठी भूमीपुत्र संघटना , विरोधी नेत्यांनीही दरासाठी कंबर कसली आहे. सोयाबीन उत्पादनात देशात मध्य प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचे स्थान आहे. मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने १४ पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली होती. त्यामध्ये सोयाबीनच्या दरात गतवर्षीपेक्षा प्रतिक्विंटल ४८६८ रुपये वरून ५३२८ प्रति क्विंटल म्हणजे ४६० रुपये इतकी वाढ केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पण तो अतिवृष्टीच्या पावसात वाहून गेला. यावर्षी अतिवृष्टीमुळे राज्याच्या सर्वच भागात सोयाबीन पिकाला जबर फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी चार हजार रुपये दर काही तुरळक केंद्रामध्ये मिळत आहे. तर अन्यत्र त्याहीपेक्षा कमी दर मिळत आहे. हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीनची विक्री होत आहे. खासगी बाजारात शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाची उत्पादकता घटली आहे. त्यातच हमीभावापेक्षा कितीतरी कमी किंमत मिळू लागल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये आणि दिवाळी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची ही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन शेतकरी नेत्यांनी या प्रश्नावर आवाज उठवण्याची तयारी केली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी प्रश्न ऐरणीवर आणण्याचे डावपेच!
शेतकऱ्यांना सोयाबीन प्रति क्विंटल 4000 रुपयात विकावे लागत आहे. राज्य सरकारने तातडीने राज्यभर प्रत्येक बाजार समितीत सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे,सोयाबीन प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून पालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी प्रश्न ऐरणीवर आणण्याचे डावपेच दिसत आहे.