सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर?
मानोरा (Soybean Price) : तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासमोर जगावे की मरावे ? अशा प्रकारचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व खाजगी व्यापारी यांना शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणेच सोयाबीन (Soybeans) खरेदी करावे, अशा प्रकारचे शासनाने (Government) तात्काळ आदेश देऊन, शेतकऱ्यांना (Farmers) दिवाळीपूर्वी भरीव स्वरूपाची आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सोयाबीनची मळणी सुरू, अति पावसामुळे उत्पादनात घट!
गत अनेक वर्षापासून कपाशी पिकावर बोंड अळीचे आक्रमण झाल्याने, शेतकऱ्यांनी कपाशी पिकाकडे दुर्लक्ष करून सलग सोयाबीन किंवा तूर सोयाबीन अशा पिकाची मोठ्या प्रमाणात खरिपात पेरणी केली. मशागत ते पीक काढण्यासाठी परिपक्व होईपर्यंत सरासरी १८ हजार पाचशे ते १९ हजार रुपयापर्यंतचा खर्च शेतकऱ्यांना आला आहे. मे महिन्यात अवकाळी पाऊस नंतर ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार अतिवृष्टी तसेच सततचा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकात मोठ्या प्रमाणात ओलावा राहिला. त्यामुळे सोयाबीनच्या झाडाला नाममात्र स्वरूपात फुले व शेंगा लागल्यात, परंतु नैसर्गिक वातावरण व जमिनीत साचलेले पाणी अर्थात मोठ्या प्रमाणात असलेला ओलावा यामुळे सोयाबीनच्या शेंगातील दाणे पाहिजे त्या प्रमाणात परिपक्व झाले नाहीत. पावसाने काही दिवसापासून उघडीप दिल्याने, तसेच सोयाबीन पीक कापणीला अर्थात काढणीला आल्याने, तालुक्यातील सर्वच गावातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगणी व काढणे हे काम सध्या स्थितीला तालुक्यात चालू आहे. एक एकरातील किंवा एक बॅग सोयाबीन सोंगण्याला ३२०० ते ३३०० रुपये पर्यंतचा मजुरीचा एक बॅगचे भाव आहे. तसेच प्रतिक्विंटल २५० ते २७५ रुपये पर्यंत मशीन मधून सोयाबीन काढण्याचा दर आहे. सोयाबीन काढल्यानंतर काही शेतकऱ्यांना एकरी २ क्विंटल पासून तर ४ क्विंटल पर्यंतचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याची विदारक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.
हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी!
शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी!
खाजगी व्यापारी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) तयार झालेले सोयाबीन जेव्हा शेतकरी विक्रीस आणतात त्यावेळी ३२०० ते ३५०० पर्यंत काढलेल्या सोयाबीनला भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना जगावे किंवा मरावे या प्रश्नाने तो कमालीचा बेचैन झाला असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी शासकीय खरेदी केंद्र (Government Procurement Centre) तात्काळ चालू करून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याचे सक्त आदेश द्यावे, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाने शासकीय खरेदी तात्काळ सुरू करावी, किंवा हमीभावाने शेतकऱ्याचे सोयाबीन खाजगी व्यापारी व मार्केटमध्ये खरेदी करून व्यापाऱ्यांनी घेतलेच पाहिजे, अशा प्रकारची सक्ती करावी. तसेच शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज म्हणून दिवाळी व नाग दिवाळी साजरी करण्यासाठी प्रति एकर दहा हजार रुपयाची मदत देण्याची मागणी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमधून होत आहे.