केंद्रीय मंत्री मंत्र्याचे आश्वासन हवेत
मानोरा (Groundnut Farmer) : तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी गौरव पवार यांनी बाजार समितीचे प्रांगणात विक्रीसाठी आणलेले भुईमूग पिक अवकाळी पावसाने वाहून गेले होते. याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पिडीत शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधत सरकार तुझ्या पाठीशी असुन संपूर्ण नुकसान भरपाई देईल, असे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या आश्वासनाला दिड महिना उलटूनही आर्थिक मदत मिळाली नसल्याने, कधी मिळणार मदत असे म्हणण्याची पाळी शेतकऱ्यावर आलेली आहे.
तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी गौरव पवार यांनी शेतातील भुईमुगाच्या शेंगा तालुका ठिकाणी मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी १५ मे रोजी आणल्या होत्या. त्याच दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने बाजार समिती प्रांगणात ओट्याखाली टाकलेल्या शेंगा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या. पिक वाचविण्याचे प्रयत्न शेतकरी गौरवचे व्यर्थ ठरले. त्याच्या डोळ्यादेखत पिक वाहत असताना ते हतबल झाले होते.
या आलेल्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुकसान झाले होते. सरकारकडून आतापर्यंत नुकसानीची एक रुपयाही नुकसानीची मदत मिळालेली नाही. केंद्रीय कृषी मंत्र्याच्या आश्वासनाची प्रत्यक्ष अमलबजावणी झालेली नसल्यामुळे शेतकरी कुटुंबासह परिसरात शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सरकारकडून अनेक वेळा आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगितले जाते. मात्र संकटकाळात शेतकऱ्यांना मदती ऐवजी आश्वासन दिले जात असल्याचे अनुभव बोरव्हा येथील शेतकऱ्यांच्या आपबितीवरून अनुभवास येत आहे.
रब्बी हंगामात भुईमुंगाचे उत्पादन समाधानकारक हाती आले. मात्र बाजार समितीत विक्रीस नेल्यावर अवकाळी पावसाच्या पाण्यात त्या शेंगा वाहून गेल्या. केंद्रीय कृषी मंत्र्यानी त्यावेळी संपर्क साधून नुकसानीचे भरीव आश्वासन दिले. मात्र अद्यापही मदत मिळालेली नाही. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी कुटुंबाकडून होत आहे.