Gadchiroli :- आतापर्यंत चुल आणि मुल यामध्येच गुरफटलेल्या चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील १९ महिलांनी एमईएलच्याच्यावतीने देण्यात आलेले हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्याने आता या महिलांच्या हाती वाहनांचे सुकाणु राहणार आहेत.
कोनसरी येथील महिलांच्या हाती आता वाहनांचे सुकाणू
कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेचा (Gender equality) एक नवीन अध्याय लिहिताना, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या कुशल कार्यबलात सामील केले आहे. हलके मोटार वाहन चालविण्याचे एलएमईएल-प्रायोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आता या महिलांना कंपनीत नोकरी मिळाली आहे. याच वर्षी जूनमध्ये, एलएमईएलने कोनसरी गावातील १९ महिलांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात हलके मोटार वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. ४५ दिवसांच्या निवासी कार्यक्रमादरम्यान, या महिलांना हलके मोटार वाहन चालविण्याचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे त्यांचा आत्मविश्वासच नाही तर प्रतिष्ठेची भावनाही अधिक वृद्धिंगत झाली. या महिलांनी नवीन कौशल्य आत्मसात केल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटला.
या महिला एलएमईएल परिवारात सामील झाल्यामुळे, त्यांच्या जीवनात प्रगतीचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारीद्वारे उच्च भूमिकांसाठी पात्रता मिळवून प्रगतीची शिडी चढण्याचा सल्ला एलएमईएलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ह्याप्रसंगी नवनियुक्तांना दिला.