मोहाडी तालुक्यातील ताडगाव/ सि. ग्रामपंचायतीचा अफलातून कारभार
भंडारा (Tadgaon GramPanchayat) : मोहाडी तालुक्यातील ताडगाव/सि. ग्रामपंचायतीचा अफलातून कारभार चव्हाट्यावर आला आहे. ग्रामपंचायतीमार्फत चार पांदन रस्त्यांची कामे नियमबाह्य करून शासकीय निधीची रोजगार सेवक व सरपंच यांनी अफरातफर केले. कामावर मजूर न जाता त्यांच्या नावे पैसे टाकण्यात आले. (Tadgaon GramPanchayat) मातीकाम न करताच मुरूम टाकून थातूरमातूर कामे करण्यात आले. या सर्व रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
मातीकाम न करताच केली रकमेची उचल
ताडगाव/सि. ग्रामपंचायतमार्फत (Tadgaon GramPanchayat) सन २०२४-२५ या वर्षांत चार पांदन रस्त्याचे खडीकरणाचे काम करण्यात आले. यामध्ये भिवराव हलमारे यांचे शेतापासून ते देवदास कडव यांचे शेतापर्यंत, फुलचंद धुमनखेडे ते प्रवीण सिंगाडे पादंन रस्ता, रत्नाकर शरणागते ते गुलाब पराते यांचे शेतापर्यंत व बिरज वनवे ते होमराज हारगुडे यांचे शेतापर्यंत पांदन रस्ता खडीकरणाची कामे करण्यात आले. परंतु, सदर पांदन रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे माती काम न करता मुरूम टाकून थातूरमातूर कामे करण्यात आले.
जिल्हाधिकार्यांकडे तक्रार; दोषींवर कारवाईची मागणी
कामावर एकही मजून न जाता त्यांची हजेरी दाखवून रोजगार सेवक याने चारही रस्ता कामाचे मस्टर करण्यात आले. सदर कामावर जेसीबी व ट्रॅक्टरच्या मदतीने रस्त्यांवर मुरूम पसरविण्यात आले. रोजगार सेवक व सरपंच यांनी स्वत: ठेकेदारी केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. सदर कामाचे पैसे गावातील जवळच्या लोकांच्या नावाने मस्टर काढून त्यांच्याकडून लाखो रुपयांची उचल केली.
कामावर मजूर न जाता त्यांच्या नावाने पैसे घालणे, मजुराऐवजी कामे न करता ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने करणे, मजूर दाखवून त्यांच्या नावे घातलेल्या रक्कमेची वसुली करणे, अशाप्रकारे नियमबाह्य कामे करून शासनाच्या रक्कमेची अफरातफर करण्यात आले. या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा मागणीची तक्रार जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेली आहे.
तक्रारीवर राजेश भिलकर, रमेश हलमारे, संभा धांडे, सेवक डोये, कुंडलिक धांडे, श्रीकृष्ण चौधरी, शिवशंकर डहाके, गुलाब राऊत, राजू शहारे, लोकचंद डहाके, रामभाऊ बुध्दे, तेजराम बुध्दे, चंद्रभान चौधरी, राजकुमार शहारे, गणेश हलमारे, प्रभूदास शहारे, प्रशांत सिंदपुरे, दिनेश हलमारे, जगदिश सपाटे, डुलीचंद धांडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.




 
			 
		

