गोंदिया जिल्हा विभागात प्रथम
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर () : प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात 2 लाख 85 हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी 2 लाख 73 हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते शुक्रवार, 6सप्टेंबर रोजी गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) टप्पा एकचे 95 टक्के उद्दिष्ट्य पूर्ण झाले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष 2022-23) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बिदरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) पहिल्या टप्प्यात नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांसाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी 2 लाख 73 हजार घरकुल उभारण्यात आली. उर्वरित 12 हजार घरकुलांचे उद्दिष्टयही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला.
80 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 15 सप्टेंबर रोजी ‘प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) टप्पा-दोन’ अंतर्गत देशातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ वितरीत होणार आहे. नागपूर विभागातील 80 हजार पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातही हा लाभ जमा होणार आहे. त्यासाठी गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांनी 100 टक्के नोंदणी केल्याचे सांगत उर्वरित जिल्ह्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी यंत्रणांना दिले. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य (PM Awas Yojana) योजनेतंर्गत विभागात 14 हजार 800 भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित 400 लाभार्थ्यांनाही लवकरच जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यांमध्ये रामटेक सरस
केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याने सरस कामगिरी केल्यामुळे या श्रेणीतील दोन्ही पुरस्काराने या तालुक्यास सन्मानित करण्यात आले. केंद्र पुरस्कृत योजनेत गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समितीने पहिला, गोंदिया पंचायत समितीने दुसरा तर रामटेक पंचायत समितीने तिसरा क्रमांक पटकाविला. राज्यपुरस्कृत योजनेत (PM Awas Yojana) गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समितीला प्रथम क्रमांकाच्या, नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पंचायत समितीला दुसर्या तर रामटेक पंचायत समितीला तिसर्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.