Yawatmal :- आदिशक्ती, दुर्गामाता, चंडिका, अंबामाता अशी नावे विविध; मात्र, दुष्टांचा संहार करणारे ते आदर्श रूप एकच. अशाच आदिशक्ती आई दुर्गा मातेच्या उत्सवाला विधीवत पूजन करून जिल्हात मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली तर यवतमाळ शहरातील देशातील दुसर्या क्रमांकाच्या दुर्गा उत्सवाची (Durga festival) सुरुवातच डोळ्याचे पारणे फेडणारी होती. पावसाने काही काळ हजेरी लावली तरीही भाविकांच्या उत्साहात समोर पाऊस (rain) कमी पडला.
सोमवारी आदिशक्तीची आराधनेला आरंभ झाला
काही घरी विधिवत घटस्थापना करून दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्रपठण, पूजाविधी, सनई व नगारावादन अशा मंगलमय वातावरणात आदिशक्तीच्या उत्सवाला सोमवारी सुरवात झाली. नवरात्रोत्सवाचा उत्साह काही औरच असतो हाच उत्साह जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सोमवारी पाहायला मिळाला. सकाळपासूनच घरगुती घट बसविण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. घटस्थापनेसाठी अनेक जण मातीच्या घटासह देवीच्या प्रतीकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. यामध्ये घटस्थापनेसाठी देवीला सुंदर मुकुट, दागिने, तोरणे, पत्री, विड्याची पाने, झालर, आकर्षक झुंबर अशी सजावट करण्यात येते. घरगुती घट बसविण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. तसेच, सार्वजनिक मंडळांनी ‘दुर्गामाता की जय’, ‘अंबामाता की जय’चा घोष करीत दुर्गादेवीच्या मूर्तीची मिरवणुकीने उत्साहात प्रतिष्ठापना केली. तर अनेक मंडळाची प्रतिष्ठापना सायंकाळी पर्यंत करण्यात येणार आहे.
भक्तिमय वातावरणात पारंपरिक पद्धतीने शहरातील देवीच्या मंदिरामध्ये व घराघरांमध्ये घटस्थापना झाली. सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. तर शहरातील प्रत्येक चौक दुर्गा मातेच्या आगमना साठी सज्ज असल्याचे चित्र भल्या पहाटेपासूनच पाहायला मिळाले. अनेक गाव खेड्यावरून दुर्गा मातेची मूर्ती विकत घेण्यासाठी ग्रामीण भागातील दुर्गा उत्सव मंडळ यवतमाळ शहरात दाखल झाली होती.