परभणी शहरातील बेलेश्वर महादेव मंदिर परिसरातील घटना….!
परभणी (Parbhani Crime) : बेलेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी आलेल्या एका महिलेजवळील रोख रक्कम, दागिने असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवार ४ ऑगस्ट रोजी दुपारी साडे बारा ते एक या दरम्यान घडली. (Parbhani Crime) सदर प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला मेघमाळे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी या ४ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास किरायादार यांच्या सोबत बेलेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आल्या होत्या.
या वेळी त्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने असलेली पर्स आपल्या जवळील बॅगेत ठेवली होती. दर्शन झाल्यानंतर बाजुला येऊन पर्स काढण्यासाठी बॅग बघितली असता त्यांना पर्स दिसली नाही. मंदिरात दर्शन घेतेवेळी त्यांच्या शेजारी दोन अनोळखी महिला संशयित रित्या वागताना दिसून आल्या होत्या.
याच महिलांनी पर्स चोरल्याचा संशय आहे. या पर्समध्ये ११ हजार ४०० रुपये रोख व ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने मिळून एकूण ४१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल होता. सदर साहित्य चोरुन नेल्या प्रकरणी (Parbhani Crime) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.