गांधी विद्यालयाला तलावाचे स्वरूप, रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी
भंडारा (Miskin Tank Pond) : आज दुपारच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या मागे असलेल्या मिस्किन टँक तलाव (Miskin Tank Pond) ओसंडून वाहू लागला. या तलावाच्या सभोवताली बांधलेल्या आवार भिंतीच्या मध्ये तयार करण्यात आलेला अर्ध्या फुटाचा माती आणि मुरमाचा भाग खचल्याने तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले. तलावातील पाणी गांधी विद्यालयाच्या पटांगणात साचून परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले.
एवढेच नाही, तर जेसीस कॉन्व्हेंट या शाळेच्या मैदानातून पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून दोन ते तीन फुटावरून वाहू लागले आहे. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. कुठे घर कोसळले, तर कुठे शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरवला गेला आहे. या अवकाळी पावसाने अक्षरशः जिल्ह्याला झोडपून काढले आहे.
दरम्यान, आज सकाळी प्रखर ऊन्ह असताना दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन तास अखंड बरसलेल्या या पावसाने मिस्किन टँक तलावाची पाणीपातळी वाढली. (Miskin Tank Pond) सध्या तलावाचे खोलीकरण आणि सौंदर्याकरणाची कामे सुरू आहे. तलावाच्या सभोवताली सुरक्षा भिंत बांधली गेली असून त्यात अर्धा फुटाचा एक भाग माती आणि मुरूम टाकून बांधण्यात आला.
आज मुसळधार पाऊस झाल्यानंतर हा माती आणि मुरमाचा भाग खचला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत निघाला. या भागातून (Miskin Tank Pond) तलावाचे पाणी मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहू लागले. पाणी जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने गांधी विद्यालयाच्या प्रांगणात पाणी साचून संपूर्ण परिसर जलमय झाला तसेच जेसीस कॉन्व्हेंटच्या प्रांगणातून पाणी वाहत रस्त्यावर आले आणि दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावरून वाहू लागले.
मुख्याधिकारी म्हणतात…
मिस्किन टँक तलावाच्या (Miskin Tank Pond) सभोवताल आवार भिंत बांधण्यात आली. तीन महिन्यांपूर्वी या आवारभिंतीच्यामध्ये आठ ते दहा फुटाच्या एका पॅचमध्ये मुरूम माती आणि गिट्टी भरून तो पॅच बंद करण्यात आला. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे हा मातीचा पॅच निघाला. यामुळे तलावातील पाणी वाहू लागले. सध्या कंत्राटदाराला सांगून गिट्टी आणि मुरूम टाकून पाण्याचा प्रवाह कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्याधिकारी करण कुमार चव्हाण यांनी सांगितले.