निलंगा(Latur) :- निलंगा तालुक्यातील शेडोळ येथील एका सालगड्याच्या डोक्यात दगड घालून जबर मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार दि.२० रोजी मंगळवारी घडला. जखमी कचरू नरसिंग कांबळे (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलिस ठाण्यात नागनाथ तानाजी धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ०२८०/२०२४ नुसार बीएनएस अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ११५(२) बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ३५२ ,बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ३५१(२),३५१(३) नुसार तर अनु जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर हे करीत आहेत.
जीवे ठार मारण्याची धमकी
याबाबत अधिक वृत्त असे की, पिडीत कचरू नरसिंग कांबळे हे गावातच उत्तम बाबुराव धुमाळ यांच्या शेतात मागील ६ वर्षांपासून सालगडी म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे त्यांचा सहकारी तानाजी थोरमोठे यांना घेऊन शेतीकामासाठी जाताना खंडू धुमाळ यांचे बंद असलेल्या हॉटेलसमोर ‘ये म्हारग्या… धेडग्या कुठे जात आहेस?’ म्हणून नागनाथ धुमाळ यानी जातीवाचक शिवीगाळ (Abusing)केली. विनाकारण शिवीगाळ का करता? मला निट बोला’, असे म्हणाले असता ‘तुला काय निट बोलायचे?’, असे म्हणून हातात दगड घेऊन डोक्यात व कानापाठीमागे दगडाने मारहाण करून जबर जखमी केले. उचलून जमिनीवर व रोडवर जोराने आपटले, आदळले व लाथा बुक्याने जबर मारहाण (Hitting)केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी गावातील काही लोकांनी सोडवा सोडव केली. जखमी कचरू कांबळे यांना उपचारासाठी निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच निलंगा शहरातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी त्यात प्रामुख्याने गणराज्य संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता भानुदास सूर्यवंशी, भीम आर्मीचे अतुल सोनकांबळे, बहुजन समाज पार्टीचे दत्ता विश्वनाथ सूर्यवंशी, जेष्ठ पत्रकार मोहन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे धम्मानंद काळे, आदींनी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.




