हिंगोली(Hingoli):- वसमत शहरामध्ये एका सराईत गुन्हेगारावर १५ गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर एमपीडीए कारवाई केल्याने त्याची परभणी कारगृहात रवानगी करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आक्रमक पवित्रा
वसमत शहरातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिकलकरी वस्तीमधील जोगींदरसिंग रंजीतसिंग चव्हाण या गुन्हेगारावर वसमत शहर, वसमत ग्रामीण, हट्टा तसेच नांदेड जिल्हा हद्दीत शरीर व मालाविरूद्धचे १५ गुन्हे दाखल आहेत. तो सतत गुन्हे करीत असल्याने धोकादायक बनल्यामुळे वसमत शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्फत एमपीडीए (MPDA)कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी प्रस्ताव पडताळणी करून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला होता.
जिल्ह्यात आतापर्यंत 45 जणांवर एमपीडीए कारवाई
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी प्रस्तावाची सविस्तर पडताळणी करून जोगींदरसिंग रंजीतसिंग चव्हाण हा सार्वजनिक सुव्यवस्थेस(Public order) बाधक ठरल्याने एमपीडीए अंतर्गत एक वर्षाकरीता कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश दिल्याने १४ जुलैला त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन परभणी कारागृहात रवानगी केली. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास पाटील, कुंदनकुमार वाघमारे, सपोनि राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने ही कारवाई(action) केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 45 जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आलेली आहे. आणखी काही सराईत गुन्हेगार त्यांच्या रडारवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.