नागपूर(Nagpur):- मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला असा संशय आमदार निलेश राणे यांना विधानसभेत व्यक्त केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या भाषणाच्या चर्चेदरम्यान बोलताना राणे यांनी कुडाळ चे पराजित आमदार वैभव नाईक यांचा उल्लेख न करता माझ्या अगोदरचे आमदार असे म्हणून शाब्दिक हल्ला चढवला. पुतळा कोसळल्यानंतर एखादा आमदार १५ मिनिटात कसा पोहचू शकतो? असा संशय व्यक्त करून नाईक यांच्याकडे अंगुली निर्देश केला. हा पुतळा पडला की पाडला याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई (action) करावी अशी मागणी आमदार राणे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शौर्याला सलाम’ म्हणून 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg District) मालवण मधील राजकोट किल्यावर हा पुतळा उभारण्यात आलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते. त्यावेळी कामाचा दर्जा आणि या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी केलेल्या घाईवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. हा पुतळा वाऱ्याने कोसळला असल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) दिले होते.