परभणी (Parbhani) :- जिल्ह्यातील सर्वच प्रमुख महामार्गालगतच्या हॉटेल्स, धाब्यावर सर्रास अवैध दारुचा महापुर वाहत असताना १ एप्रिलपासून व्यवसाय कर ५ टक्क्यावरुन १० टक्के लावण्यात आल्याने परभणी जिल्हा बियरबार चालक संघटनेने १ एप्रिलपासून बार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धाबेचालकांना रान मोकळे झाले आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची धाबेचालकांनी कंबर कसली असतानाच राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी विना परवाना मद्यविक्री विरुध्द धडक मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे अवैध दारुविक्रेत्यांच्या (Illegal liquor sellers) मनसुब्यावर पाणी पडले आहे.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांनी विना परवाना मद्यविक्री विरुध्द धडक मोहिम हाती घेतली
दरवर्षी राज्य सरकार (State Govt) व्यवसाय करात वाढ करत आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी ५ टक्के असलेला कर आता १० टक्के वाढवण्यात आला आहे. आधीच ग्राहक बियर बारमध्ये यायला तयार नाहीत. वाईन शॉपवर आणि खानावळी, धाब्यावर सर्रास दारु मिळत आहे. यावर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. शिवाय परवाना नूतनीकरणाचे शुल्कही दरवर्षी १० टक्क्याने वाढविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात नूतनीकरणाचे शुल्क देखील परवडणारे नाही. परिणामी बियर बार (Beer bar) बंद करण्याची वेळ आली असून १ एप्रिलपासून व्यवसाय बंद करुन परवाना नूतनीकरण करणार नसल्याचा इशारा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण भिसे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील बहूतांश बार सोमवारी बंद होते. व्यवसाय कर कमी करावा, अशी मागणी करत बियरबार संघटनेने बेमुदत बार बंदचा इशारा दिला आहे.
या बंदचा अवैध दारुविक्रेत्या धाबेचालक, हॉटेल्सवाल्यांनी फायदा उचलला. मात्र आता राज्यात विना परवाना, अवैध दारुविक्री विरुध्द १ एप्रिल ते ४ मे पर्यंत धडक मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. परभणी जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विना परवाना दारुविक्रेत्याबरोबर आर्थिक हितसंबंध असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच हॉटेल्स, धाब्यावर सर्रास अवैध दारु विक्री होत असल्याचे देखील सांगितले जाते. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाची परभणी जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होईल का ? असाही प्रश्न सर्वसामान्य न नागरीकांतून उपस्थित केला जात आहे.