परभणी (Parbhani):- सोमवार १ जुलै पासून भारतीय न्याय संहितेची (Indian Judicial Codes) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पालम, गंगाखेड आणि पूर्णा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक या प्रमाणे तीन अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल
भारतीय दंड विधान (IPC) आता इतिहास जमा झाले असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यामध्ये काही कलम कमी करण्यात आले असून गंभीर गुन्हे देखील सामिल करुन घेण्यात आले आहेत. सोमवार पासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
अंमलबजावणीसाठी पोलिस, वकिलांना प्रशिक्षण देण्यात आले. रविवारी रात्री बारा ते सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पालम, गंगाखेड, पूर्णा या पोलीस ठाण्यांमध्ये तीन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यासाठी लागणारी सीसीटिएनएस (CCTNS) प्रणाली देखील अद्यावत करण्यात आली आहे. सोमवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नवीन कायद्यांविषयी मार्गदर्शन शिबीर देखील आयोजीत करण्यात आले.
सीसीटिएनएस प्रणाली सज्ज
दाखल गुन्ह्यांची नोंद सीसीटिएस प्रणालीवर घेतल्या जाते. परभणी जिल्ह्यातील सदर प्रणाली अद्यावत करण्यात आली असून भारतीय न्याय संहितेमधील कलानुसार या प्रणालीवर नोंद घेतली जात आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये मार्गदर्शन शिबीर
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै रोजी बीएनएस कायदे अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. नवा मोंढा पोलीस ठाण्यात आयोजीत कार्यक्रमास अॅड. रमण दोडिया यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोनि. समाधान चवरे, सपोनि. रसुल तांबोळी, नालंदा लांडगे, पोउपनि. अर्जून टरके, गाडेकर यांची उपस्थिती होती.