नगराध्यक्ष निवडणूक स्वबळावर की युतीत; नागरीकांत संभ्रम?
सुधिर गोमासे
तुमसर (Tumsar Election) : नगरपरिषदेची निवडणुक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार काय? की सर्वच पक्ष स्वबळावर लढणार? यात शहरातील महायुती व महाविकास आघाडी पक्षात १२ प्रभागात २५ जागा वाटप कसे होईल, कोणता पक्ष कोणासोबत जाईल? तिकिट वाटपावरुन अनेक पक्षाचे उमेदवार इकडून तिकडे आयात होतील.
आपल्यालाच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी त्याच पक्षात थांबायचे की दुसर्या पक्षात उडी मारायची ? अशा नानाविध विवंचने महाविकास व महायुतीतील घटक पक्षातील इच्छुक म्हणजेच भावी नगराध्यक्ष व नगरसेवकांची स्वप्न रंगविणार्या उमेदवारांचे मन नगरपरिषद (Tumsar Election) निवडणुकीच्या उधाण वार्यात राजकीय हेलकावे घेत आहे. अशातच राज्यात सत्तेसाठी दोस्ती करणार्या महायुतीच्या घटक पक्षात मात्र, नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहाराशहरात मतदारांना राजकीय कुस्ती पाहावयास मिळणार आहे. सत्तेत असलेल्या तुमसरातील तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
खरच महायुतीत बेबनाव आहे की मित्र पक्षासाठी स्पेसच ठेवायचा नाही! आपणच स्वबळावर लढायचे अशी काही खेळी खेळली जात आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. कालानुरुप परिस्थिती बदल घडवत असते आणि यालाच राजकारण म्हणतात. या उक्तींचा तुमसरात सध्या प्रत्यय दिसून येत आहे. गेल्या काळात राजकारणाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली आहेत. (Tumsar Election) राजकारणात घडणार्या घटना चक्रावून टाकणार्या आहेत. विशेषतः महायुती व महाविकास आघाडीत आपसातच सुरु असलेल्या राजकीय खेळ्या स्थानिक राजकारणात अस्तिव आणि वर्चस्वाचा सुप्त संघर्ष दर्शवित आहेत. विशेष करून महायुतीत सध्या मित्र पक्षापेक्षा आपली ताकद वाढविण्याची चढाओढ लागली आहे. जिल्हा नेत्यांच्या विरोधकांना आपलेसे करुन तथाकथित आप्तेष्टांनाच धडा शिकविण्याची समीकरणे महायुतीतील घटक पक्षाकडून मांडली जात आहे.
या संभाव्य उमेदवारातून नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार ठरणार
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात यांची नावे चर्चेत आहेत. सर्वांनी आपआपल्या परीने पक्षाची तिकीट मिळविण्यासाठी राजकीय गॉडफादरकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. तुमसर नगराध्यक्ष पद नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)साठी राखीव झाले आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून माजी नगरसेवक योगेश सिंगनजुडे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, याशिन छवारे, सागर गभने, सरोज भुरे, तर भाजप कडून माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, आशिष कुकडे, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, कल्याणी भुरे, काँग्रेसकडून माजी आ.अनिल बावणकर, प्रमोद तितिरमारे, अमर रगडे, अरविंद कारेमोरे, राजेश ठाकुर, आशिष निखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हेमराज नागफासे, अनिल जिभकाटे, मेहताब सिंग ठाकूर तर शिंदे सेनेकडून नितिन सेलोकर व राणे, तर उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुधाकर कारेमोरे यांचे नाव चर्चेत आहेत.