वर्धा-आर्वी मार्गावर मोरांगणा (खरांगणा) येथील अपघात
वर्धा (Dumper Accident) : वर्धा – आर्वी मार्गावर मोरांगणा (खरांगणा) येथे अनियंत्रीत डंम्पर उलटल्याने चालकासह सहकार्याचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात मंगळवारी २ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडला. या (Dumper Accident) घटनेत रस्त्याच्या कडेला असलेले घर, विटा, दुचाकी, सायकल, विद्युत खांब आदींचेही नुकसान झाले. याप्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुदैवाने यावेळी डंम्परने घराला धडक दिली नाही.
आर्वी तालुक्यातील तरोडा येथून चुरी भरलेला आर.जे. १९ जी.जे. ३११२ क्रमांकाचा डंम्पर २ सप्टेंबर रोजी येळाकेळीकडे जात होता. डंपर चालक सुरेश बाबुलाल कुमार रा. कोलूखेरी कलान राजस्थान ह.मु. तरोडा, ता. आर्वी हा सहकारी दीपचंद रा. कोलूखेरी कलान राजस्थान, ह.मु. तरोडा याच्यासह डंपर घेऊन जात होता. दरम्यान, मोरांगणा (खरांगणा) येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि नाल्याच्या पुलाच्या संरक्षण भिंतीला धडकलेला डंम्पर उलटला. पुलाच्या संरक्षण भिंतीला धडकलेल्या डंम्परमध्ये चालक आणि त्याचा सहकारी अडकले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर दोघांना बाहेर काढण्यात आले. दोघांनाही रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले. या (Dumper Accident) प्रकरणी खरांगणा (मोरांगणा) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच खरांगणा (मोरांगणा) पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक साळुंके, पोलीस हवालदार अतुल चौधरी, अमर करणे, शंकर केंद्रे, अंकुश साबळे, महेश कावळे यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. (Dumper Accident) डंम्परच्या केबिनमध्ये अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी स्थानिक युवक, नागरिकांनीही मदत केली.
चुरी भरलेला डंम्परच्या अपघाताने रस्त्याच्या कडेला असलेल्या घराचेही नुकसान झाले. डंम्परने धडक दिल्याने शौचालय तसेच बाथरुम कोसळले. चुरी पडल्याने त्याखाली आल्याने घराच्या बाहेर असलेल्या सुमारे पाच हजार विटांचे नुकसान झाले. दुचाकीदेखील चुरीखाली गेल्याने प्रफुल्ल मोरे यांच्या नवीनच दुचाकीचेही नुकसान झाले. तसेच सायकल, विहिरीचेदेखील नुकसान झाले. घराच्या भिंतीचेही यात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अंगणात मोठ्या प्रमाणात चुरी पडलेली होती.
डंम्परने पथदिव्यांच्या खांबालाही धडक दिली. त्यात पथदिव्यांचा खांब जमिनदोस्त झाला. रात्रीच्या वेळी तसेच सकाळच्या सुमारास खरांगणा (मोरांगणा) येथील महावितरणच्या कर्मचार्यांनी दुरूस्ती कार्य करून विद्युत पुरवठा सुरळीत केला. अपघातामुळे जोराचा आवाज आल्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डंम्पर उलटलेला पाहून सर्वांनाच धक्का बसला. (Dumper Accident) सुदैवाने ट्रकने लगतच्या घराला धडक दिली नाही. मात्र यामध्ये मोठे नुकसान झाले.
हा रस्ता वर्दळीचा आहे. अनेक जण पायदळ फिरायला जातात. रस्त्याच्या कडेला घरे आहेत. येथील वळण धोकादायक आहे. या अनुषंगाने येथे वेगनियंत्रक तसेच सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.




 
			 
		

