दर्शनासाठी जात असताना घडला प्रकार नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!
परभणी (Purse Snatched) : स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी स्कुटीवरुन जात असलेल्या महिले जवळील पर्स मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखींनी हिसकावून पळ काढला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पारदेश्वर मंदिर लक्ष्मी नगर येथे घडली. या प्रकरणी २८ ऑक्टोबरला सायंकाळी नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) अनोळखी दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रार्थना देशमुख या तरुणीने तक्रार दिली आहे. फिर्यादी व तिची आई स्कुटीवरुन त्रिमुर्ती नगर येथे स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी पाठीमागुन मोटारसायकलवर दोघेजण आले. गाडीवर पाठीमागे बसलेल्या एकाने फिर्यादीच्या आईच्या हातात असलेली पर्स हिसकावली. या पर्समध्ये रोख सात हजार रुपये आणि एक मोबाईल होता. चोरट्यांनी एकूण ११ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. या प्रकरणी नानलपेठ पोलिसात अनोळखी दोन इसमांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सपोनि. सुरवाडे करत आहेत.
