परभणी (Parbhani) :- पाथरी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने (Revenue Division) धडक कारवाई केली असून, दोन ठिकाणी दोन ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात अडकावण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार एस. एन. हान्देश्वार आणि त्यांच्या पथकाकडून करण्यात आली.
गौंडगाव व टाकळगव्हाण येथे महसूल विभागाची धडक कारवाई
कारवाई संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई शुक्रवार २ मे रोजी सकाळी १०.०० वाजता मौजे गौंडगाव येथे अवैध वाळू (Illegal sand) उत्खनन व वाहतुकीची माहिती तहसीलदार हान्देश्वार यांना मिळताच त्यांनी तातडीने मोटारसायकलने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांच्या सोबत ग्राम महसूल अधिकारी सचिन साबळेही होते. तपासणी दरम्यान कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर क्र .एमएच २२ एएम १४१६ वाळू वाहतूक करताना आढळून आले. ट्रॅक्टरमध्ये १ ब्रास वाळू आढळल्याने ते ताब्यात घेऊन पाथरी तहसील कार्यालयात दंडात्मक कार्यवाहीसाठी (Proceedings) अडकावून ठेवण्यात आले आहे.
बुधवारी झालेल्या दुसर्या कारवाईत टाकळगव्हाण येथेही अवैध वाळू वाहतूक करणारे जॉन डीअर (John Deere) कंपनीचे ट्रॅक्टर (वाहन क्रमांक उपलब्ध नाही) जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शंकर हान्देश्वार यांनी केली. या ट्रॅक्टरमध्येही १ ब्रास वाळू आढळून आली असून, पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी ते तहसील कार्यालयात अडकावण्यात आले आहे. महसूल विभागाच्या यावेळीच्या तत्पर कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.