उदगीर (Udgir Government Dairy) : शेकडो हाताला प्रत्यक्ष आणि हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणारी, कधीकाळी उदगीरच्या वैभवात भर टाकणारी, शासकीय डेअरी शेवटी भंगारात निघाली आहे. शासकीय स्तरावरून (Udgir Government Dairy) डेअरीतील साहित्य विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेल्या उदगीर येथील (Udgir Government Dairy) शासकीय डेअरीला पुन्हा सुरू करण्यासाठी फक्त १२५ कोटी रुपये लागणार आहेत. काही दिवसापूर्वी एनडीबीबीच्या पथकाने डेअरीची पाहणी करून त्याचा अहवाल केंद्राकडे सोपविला होता. त्यातून ही माहिती समोर येत असून लागणारा पैसा कुणी खर्च करायचा यावरून घोडे अडले आहे. पण, मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचा दावा करणारे क्रीडा मंत्री डेअरीच्या मुद्यावर मात्र शांत आहेत. तब्बल ४ हजार कोटी रुपये सिमेंटची जंगले उभी करण्यासाठी आणू शकतात तर शेकडो बेरोजगार तरुणांच्या व शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळवून देणाऱ्या डेअरीसाठी फक्त १२५ कोटी आणू शकत नाहीत का.? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रक्रिया थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन
डेअरी पुनर्जीवन समिती एकीकडे पुन्हा एकदा डेअरी चालू करण्यासाठी लढा उभारत आहे. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले आहे. केंद्रीय पातळीवर याचा लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा असताना राज्य सरकारने मात्र (Udgir Government Dairy) शासकीय डेअरीतील साहित्य विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदरील प्रक्रिया तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीने दिला आहे.