तब्बल ३० ते ४० सागवान व इतर झाडांचा बळी
तुमसर (Dongri Khan Area) : जगप्रसिद्ध मॅगनीज डोंगरी खान परिसरात पर्यावरणाला घातक ठरणारी घटना समोर आली आहे. मॅगनीज खान परिसरातील भाडेतत्त्वावरील जागेत तब्बल ३० ते ४० सागवान झाडांची तसेच इतर प्रजाती झाडांची कत्तल यंत्रांच्या मदतीने करण्यात आली. येथे यंत्राने मुळापासून झाडे उपटली आहेत. मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खान प्रशासनाने वनविभागावरून कोणतीच परवाने घेतली नाही अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल भंडारा येथील वन विभागाच्या अधिकार्यांनी घेतली. बुधवारी दुपारच्या सुमारास भंडारा येथून सहाय्यक उपवनसंरक्षक रितेश भोंगाडे दाखल झाले होते.
डोंगरी खान परिसरात (Dongri Khan Area) सागवान झाडांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळताच नाका डोंगरी वनपरिक्षेत्राचे प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी छगन रहांगडाले, सहायक वनपरिक्षेत्राधिकारी धर्मराज यादव यांनी मंगळवारी सायंकाळी या परिसराला भेट दिली. नंतर बुधवारी भंडारा येथील सहाय्यक उपवनसंरक्षक रितेश भोंगाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे सागवान झाडे कापण्यात आल्याचे प्रत्यक्ष घटनास्थळी दिसून आले. ही सर्व झाडे विनापरवानगी तोडण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सागवानासारख्या मौल्यवान वृक्षांची कापणी करण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक असते. मात्र खान प्रशासनाकडे कोणतेही परवाना पत्र नसल्याचे समोर आले आहे. प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी यांनी खान परिसरातील ही जागा महसूल प्रशासनाची आहे असे सांगितले. खान प्रशासनाने येथे वृक्ष लागवड केली. पूर्वी ही जागा वन विभागाकडे होती, अशी माहिती आहे. बाळापुर येथील गट क्रमांक ९६ मध्ये हे सागवान झाडांची लागवड करण्यात आली होती. त्यात सुमारे चार ते पाच हेक्टर जागेचा समावेश आहे. येथे सुमारे १६० ते १७० मोठी झाडे आहेत. त्यात इतर जातींच्या झाडांचा समावेश आहे.
काय आहे नियम : सागवान प्रजाती ही मौल्यवान व दुर्मिळ मानली जाते. त्यामुळे सागवान वृक्ष कापण्यापूर्वी नियमानुसार स्थानिक क्षेत्रातील वनविभागाची परवानगी घेणे अनिवार्य असते. पाच वर्षापेक्षा अधिक वर्षाची झाडे असल्यास त्याकरिता वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. डोंगरी खान परिसरातील कापण्यात आलेली सागवान झाडे ही १५ ते २० वर्षापेक्षा अधिक वर्षाची असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे खान प्रशासनाने नियमानुसार वन विभागाची परवानगी घेण्याची गरज होती. हे प्रकरण गंभीर असून खान प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खान प्रशासनात यामुळे एकच खळबळ माजली आहे.
जबाबदारी ढकलण्याचा खेळ : या प्रकरणावर खान प्रशासनातील जबाबदार अधिकार्यांनी परस्परविरोधी दावे केले आहेत. खान व्यवस्थापकांनी कंत्राटदाराने झाडे कापली असे सांगत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. भाडेतत्त्वावर मिळालेल्या जागेत खान प्रशासनाने सागवान झाडांची लागवड केली होती. इलेक्ट्रिक खांब उभारणीसाठी ही मौल्यवान सागवान झाडे कापल्याची माहिती दिली.
नागरिकांचा संताप, वनविभागाकडे अपेक्षा : या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. सागवान ही मौल्यवान व संरक्षित प्रजाती असल्याने या प्रकरणाची वनविभागाकडून सखोल चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परिसरातील हरितसंपदा नष्ट करणार्या या कृतीवर कठोर कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे.
डोंगरी खान परिसरातील जागा ही लीजवर घेण्यात आली आहे. तिथे प्लांटेशन खान प्रशासनाने केले आहे. वीज खांब उभे करण्याकरिता ही झाडे कंत्राटदाराने कापली आहेत. झाडे कापण्याच्या परवानगीबाबत चौकशी करून पुढे जे निष्पन्न होईल ते बघू.
-सुधीर पाठक, खान व्यवस्थापक डोंगरी बु.
महसूल विभागाच्या ताब्यातील सागवान प्रजातीचे १२ व पळसाचे २ झाडे विनापरवानगीने तोडल्याचे निदर्शनास आले. डोंगरी माईन्स विरुद्ध महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम अंतर्गत वन गुन्हा नोंद करण्यात आला तसेच एक जेसीबी जप्त करण्यात आली.
-छगन रहांगडाले, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी नाकाडोंगरी




