हिंगोली (Vitthal Darshan Train) : रेल्वे विभागाने आषाढी एकादशी निमित्त मोठा गाजा वाजा करून दिलेल्या रेल्वेने विठ्ठलाचे दर्शन दामदुप्पट महागले आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने आषाढी एकादशी निमित्त अकोला – पुर्णा मार्गावरून एक विशेष रेल्वे जाहीर केली आहे. ५ जुलै रोजी अकोला येथून मिरजसाठी निघणार्या या रेल्वेमुळे वाशिम, हिंगाली, वसमत, परभणी या भागातील प्रवाशांना थेट पंढरपूर पर्यंत जात येणार आहे.
ही बातमी कळताच आनंदातिरेक झालेल्या (Vitthal Darshan Train) विठ्ठल भक्तांचा रेल्वेचे भाडे बघून मात्र हिरमोड झाला आहे. हिंगोली ते पंढरपूर पर्यंत साधारण आरक्षित डब्ब्यातून प्रवास करावयाचा असल्यास ५६५ रुपये मोजावे लागणार आहेत. याच मार्गाने नियमित चालणार्या नागपूर – कोल्हापूर एक्सपे्रसला हिंगोली ते पंढरपूर करीता केवळ २९० रुपये तिकीट लागते. वातानुकूलित डब्यातून प्रवास करण्याचा सर्वसाधारण वारकरी विचारही करू शकत नाहीत. नागरपूर – कोल्हापूर रेल्वेने या प्रवासासाठी ७७६ रुपये लागत असताना अकोला – मिरज या विशेष रेल्वेने जावयाचे झाल्यास तब्बल १५२० रुपये मोजावे लागत आहेत.
तिकीट दर तर जवळपास दुप्पट झाले आहेच. शिवाय (Vitthal Darshan Train) लांबच्या मार्गाने रेल्वे जात असल्याने ११ तासांच्या प्रवासाला १९ तास लागत आहेत. नियमित चालणारी नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस लातूर रोडच्या पुढे कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला जात असते. त्या ऐवजी विशेष रेल्वे लातूर रोडच्या पुढे कर्नाटकात जाऊन परत महाराष्ट्रात येत असल्याने ८ तास भाविकांना नहाक या रेल्वेचा प्रवास करावा लागणार आहे. नेहमी प्रमाणे यावेळीही नावाखातर विशेष रेल्वे देऊन दक्षिण मध्य रेल्वेने अकोला – पुर्णा मार्गावरील प्रवाशांची चेष्टा केली असल्याचे बोलले जात आहे.