भंडारा (Bhandara):- जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात ४-५ दिवसांपासून संततधार पाऊस (Rain)कोसळत आहे. नदी नाल्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसाअगोदर पवनी तालुक्यातील आसगाव व लाखांदूर तालुक्यातील ओपारा व राजनी गावाला पुराने वेढा घातला होता. शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. पवनी व लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली सापडली. अनेक मार्ग बंद पडून गावांचा संपर्क तुटला होता. शेकडो घरांची पडझड होऊन मोठे नुकसान (Loss) झाले. सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली. शेत पीक पाण्याखाली आल्याने शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. सर्वत्र अतिवृष्टीने हाहाकार केला असतांना जनजीवन विस्कळीत झाले. जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा भंडार्यात पूर परिस्थिती निर्माण झाली.
नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात व लगतच्या प्रदेशात अतिवृष्टी (heavy rain) होत असल्याने धापेवाडा बॅरेज, बावनथडी प्रकल्प, संजय सरोवर तसेच पुजारीटोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने वैनगंगा नदीने(Wainganga River) धोक्याची पातळी ओलांडली. भंडारा जवळील कारधा पुलावरून जवळपास दोन फूट पाणी वाहत आहे. परिणामी गोसे धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले. धरणाचे दोन गेट २ मीटरने तर ३१ गेट ३ मीटरने उघडण्यात आले. धरणातून ९ हजार ८८२ क्युमेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन शहरातील गणेशपूर व अन्य भागात पुराचे पाणी शिरले. कारधा येथील तीन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वैनगंगा नदी पुलावर जाऊन पाहणी केली. दि.२४ जुलै रोजी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. वैनगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता असून धरणातील पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. आठवडाभरापासून नुकतेच रोवणी झालेले धान पीक पाण्याखाली सापडल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुन्हा शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. संततधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. प्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.