६ शेतकर्यांनी दिला होता उपोषणाचा इशारा!
हिंगोली (Wakhar Corporation) : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ (Maharashtra State Warehousing Corporation) हिंगोली शहर येथील गोदामातील हळदीच्या मालाला किड लागुन नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा शेतकर्यांनी दिला होता. त्यावरून ९ ऑक्टोंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह पथकाने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत शेकडो क्विंटल शेती मालाची नासाडी झाल्याचे दिसून आले.
अप्पर जिल्हा आधिकार्यां च्या पथकाने प्रत्यक्ष केली पाहणी!
जिल्हाधिकारी कार्यालयात श्रीराम ग्यानोजी पवार रा. खांबाळा गणेश सिताराम जगताप रा इसापूर रमणा, रामेश्वर लक्ष्मण शिंदे रा सावा, दिलीप धनाजी कुटे रा. मंगळवारा बाजार हिंगोली, गजानन बापुराव बांगर, बापुराव सखाराम बांगर रा. वंजारवाडा हिंगोली या शेतकर्यांनी निवेदन देऊन त्यांच्या शेती मालाची नासाडी झाल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सदर प्रकरणात तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याच्या सूचना दिल्याने ९ ऑक्टोंबर गुरूवार रोजी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांच्या पथकाने वखार महामंडळाच्या गोदामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ज्यामध्ये अनेक ठिकाणी सोयाबीन, हळद, हरभरा या पिकांच्या पोत्यांना कीड (Insect) लागल्याचे दिसून आले. तर काही ठिकाणी शेती माल पाण्याने भिजल्याने त्यावर बुरशी दिसून आली. अशा प्रकारात शेकडो क्विंटल धान्य खराब झाल्याचे प्रथमदर्शनी पथकाला दिसून आले. या पाहणीनंतर पथकाकडून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोण दोषी आढळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.