वर्धा (Wardha) :- राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. याचेच एक पुढचे पाऊल म्हणून एसटी महामंडळाच्या वर्धा विभागात तब्बल ५३ इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून फेब्रुवारी अखेरपर्यंत रस्त्यावरून धावताना दिसणार आहेत.
डिझेलवर धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या २१५
विभागाच्या बस ताफ्यातील डिझेलवर धावणाऱ्या बसेसची संख्या कमी करून पर्यावरणपूरक अशा विद्युत बसेस चालविण्याचे धोरण विभागाने स्वीकारले आहे. त्यानुसार एका कंपनीकडून बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. याकरिता आर्वी व सेवाग्राम येथे प्रत्येकी एक एकरावर चार्जिंग स्टेशनची(Charging station) उभारणी करण्यात येणार आहे. आर्वी आगाराच्या ताफ्यात २२ तर वर्धा आगाराच्या ताफ्यात ३१ बसेस फेब्रुवारी अखेरपर्यंत दाखल होणार असल्याचे वर्धा विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहेत. वर्धा विभागांतर्गत वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, आर्वी आणि तळेगाव असे पाच आगार असून डिझेलवर घावणाऱ्या बसगाड्यांची संख्या २१५ आहे. अनेक बसेस नादुरुस्त आणि कालबाह्य आहेत. परिणामी, रस्त्यावर प्रवासी जास्त आणि बसेस कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वर्धा विभागांतर्गतच्या आगारात लवकरच नऊ मीटर आणि १२ मीटर लेंथच्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असल्याने जिल्ह्यातील एसटीच्या प्रवाशांना निमआराम असलेल्या हिरकणी बसेसच्या भाडेदरात इलेक्ट्रिक बसचा(Electric bus) गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. बसेसवर कंत्राटदारांचे चालक असणार असून एसटी महामंडळ प्रती किलोमीटर ४८ रुपये प्रमाणे कंत्राटदाराला पैसे अदा करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
