राज्यपालांच्या हस्ते शपथविधी, शेतकरी कुटुंबातील ठाकरे यांची गावाबाबत आत्मियता
वर्धा (Ravindra Thackeray) : आपल्या जिल्ह्यातील, गावातील व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यानंतर आनंदासोबतच प्रेरणाही मिळते. अनेकांसाठी असे प्रसंग आदर्शवत ठरतात. त्यातून अनेक जण प्रेरणा घेत जीवनाला आकार देण्याचे प्रयत्न करतात. वर्ध्याच्या सुपुत्राचेही कार्य असेच प्रेरणादायी ठरणारे आहे. वर्ध्याचे सुपूत्र रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) यांची राज्य माहिती आयुक्तपदी निवड झाली आहे. ही बाब सर्वांसाठीच भूषणावह ठरणारी आहे.
जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील केळापूर येथील रहिवासी रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) यांचा राज्य माहिती आयुक्त पदाचा शपथविधी महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. ३१ मार्च २०२५ रोजी नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त या पदावरून ते नुकतेच निवृत्त झाले. त्यानंतर शासनाने त्यांना राज्याच्या माहिती आयुक्तपदी नियुक्त केले. वर्धा शहरातच त्यांची जडणघडण झाली. त्यांचे वडिल हनुमंत ठाकरे लाचलुचपत विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली नागपूर येथे झाली. रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) यांनी प्रशासकीय सेवेसाठी असणारी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यानंतर ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. आजही ठाकरे यांची गावाबद्दल आत्मियता कायम असून गावात येजादेखील असते.
नागपूर येथे जिल्हाधिकारी पदावर असताना कोरोना काळामध्ये त्यांनी परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रामाणिक, निर्भीड शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली असता, ही सर्व आई-वडिलांची पुण्याई आहे. त्यांच्या संस्काराने आज हा दिवस पाहायला मिळतो आहे. आज ते दोघे हयात नाहीत. त्यांची उणीव भासत असल्याचे रवींद्र ठाकरे म्हणाले.
रवींद्र ठाकरे यांच्या विषयी संक्षीप्त माहिती
रवींद्र ठाकरे (Ravindra Thackeray) आयएएस. शिक्षण- एमएससी अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स. ३/१९९४ ते ६/२००९ पर्यंत उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. भंडारा येथे परिविक्षाधीन. परिविक्षाधीन काळात मौदा येथे पहिली पोस्टिंग. एसडीओ वर्धा, आरडीसी गडचिरोली, एसडीओ मोर्शी, आरडीसी अमरावती, उपजिल्हाधिकारी महसूल यवतमाळ म्हणून नियमित जबाबदारी. गडचिरोली येथे सर्वोत्तम जनगणनेच्या कामासाठी रौप्य पदक. अतिरिक्त आयुक्त अकोला २००९-११. उपायुक्त महसूल अमरावती २०११-१६. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी आयएफएडी, जीओएम आणि टाटा ट्रस्ट प्रकल्पासाठी प्रकल्प संचालक सीएआयएम (कृषी समृद्धी) म्हणून अतिरिक्त कार्यभार.
अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा येथे जात वैधता समितीचे अध्यक्ष आणि नांदेड-२०१६-१७. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया २०१७. अतिरिक्त विभाग आयुक्त नागपूर २०१८. २०१८ पासून विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, एक राज्य सरकार आणि एनडीडीबी प्रकल्प (मदर डेअरी प्रकल्प) च्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार. २०१८ पासून कृषी विभागाच्या अधिकार्यांसाठी एक सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आणि राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी एक विभागीय प्रशिक्षण संस्था, वनमती संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार. (त्यादरम्यान १.५ वर्षांचा ब्रेक) सप्टेंबर २०२३ पर्यंत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर महानगरपालिका २०१८-१९. जिल्हाधिकारी नागपूर २०१९-२०२१. अतिरिक्त आदिवासी आयुक्त नागपूर-२०२१-२३.