रिसोड (Washim) :- शेतीवर असलेल्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने शेतातील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता च्या दरम्यान रिसोड तालुक्यातील सवड येथे उघडकीस आली.
दोरीच्या साह्याने घेतला गळफास
श्रीकांत गाडे वय 48 वर्षे राहणार सवड असे मृतकाचे नाव असून याप्रकरणी मृतकाचा मुलगा वैभव श्रीकांत गाडे वय 24 वर्षे यांने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे वडील हे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रयागराज (Prayagraj)येथून कुंभमेळाचे दर्शन घेऊन परतले होते. रात्री साडेनऊ वाजता जेवण करायला बाहेर जातो असे म्हणून ते बाहेर निघून गेले.रात्री अकरा वाजेपर्यंत ते घरी पोहोचले नसल्याने मुलगा व अन्य नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. प्रथम त्यांनी सवड परिसरातील जाऊन चौकशी केली मात्र त्या ठिकाणी आढळून न आल्याने त्यांचा शोध घेत घेत सवड शेत शिवारातील त्यांच्या स्वतःच्या शेतातील गोठ्यात जाऊन पाहिले असता दोरीच्या साह्याने श्रीकांत गाडे हे गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती तात्काळ रिसोड पोलिसांना देण्यात आली.
रिसोड पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनाकरिता (Autopsy) रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. श्रीकांत गाडे हे गेली अनेक दिवसापासून शेतीवर असलेल्या कर्जामुळे नेहमी चिंतेत राहायचे. यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.