हिंगोली(Hingoli):- सिद्धेश्वर धरणातून होणार्या पाईप लाईनद्वारे पाण्याची गळती थांबविण्यासाठी नगर पालिका पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. तब्बल तीन दिवसरात्र दुरूस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे.
दहा ते पंधरा वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दुरूस्तीचे काम
आगामी काही दिवसात अनेक सण व उत्सव आहेत. या दरम्यान शहरवासीयांना निर्जळीला सामोरे जावे लागू नये म्हणून नगर पालिका पाणी पुरवठा विभागातर्फे खबरदारी घेण्यात आली. त्याच निमित्ताने सिद्धेश्वर धरणाजवळील पाण्याची गळती व काही ठिकाणी पाईप कुजल्याने नगर पालिका पाणी पुरवठा विभागाच्यावतीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह पालिकेच्या अन्य कर्मचार्यांनी तब्बल तीन दिवस दुरूस्तीचे काम करण्यात आले. २३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता पाईप जोडणीचे काम पूर्ण झाले असून रात्रीच्या सुमारास पाईपलाईनद्वारे (Pipeline) पाणी पुरवठा सोडला जात आहे. त्यामुळे हिंगोली शहरात आज २४ ऑगस्टला ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार पाणी पुरवठा सोडला जाणार आहे. बर्याच कालावधीनंतर सिद्धेश्वर धरणाजवळील पाण्याची गळती व इतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने भविष्यात निर्जळीचा सामना करावा लागणार नाही. पाईप लाईन दुरूस्तीकरीता पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी अभियंता वसंत पुतळे, सय्यद शकील हाश्मी, शकील, अमोल पाटोळे, शिवाजी जाधव, पिंटू मोटे आदी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.