आर्णी (Yawatmal) :- तालुक्यातील पैनगंगा तसेच अडाण नदी पात्रावर रेती तस्करांचा कब्जा असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरोडा येथे अडाण नदी पात्रात रात्रंदिवस रेती उपसा सुरू असताना काही दिवसांपासून काठावर असलेली माती तस्करी (soil smuggling) सुरू झाली होती. पुराचे पाणी गावात शिरेल या भितीमुळे गावकर्यांनी काल रेती तस्करांचा रस्ता जेसीबी मशीन (JCB Machine) लावून खोदून बंद केला. यावेळी जवळपास शंभर गावकर्यांनी नदीपात्रात महसूल प्रशासन विरोधात संताप व्यक्त केला. एकीकडे तहसील प्रशासन हप्ता घेत असल्याने रेती तस्करांची मुजोरी वाढली असा आरोप ही ग्रामस्थांनी यावेळी केला.
मंडळ अधिकारी, तलाठी यांना गावकर्यांनी माहिती दिली तरीही तस्करी सुरू
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बिनधास्त रेती उपसा सुरू असल्याने महसूल विभागाचे कोणतीही भिती तस्करांना राहीली नसल्याचे बोलल्या जात आहे. मोजक्या टिप्पर, टँकरवर कारवाई केल्या जात असल्याने आता तालुक्यात रेती तस्करांचा दबदबा निर्माण झाला असून, महसूल विभागाच्या (Revenue Division) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील अडाण नदी पात्रातील रेती तस्करी होत असताना आता काठावर असलेली माती जेसीबी मशीनच्या साह्याने खोदून विट भट्टी करीता ट्रॅक्टर मधुन वाहतूक केली जात होती. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी यांना गावकर्यांनी माहिती दिली तरीही तस्करी सुरू होती अखेर गावकर्यांनी वाहतूक होत असलेला रस्ता बंद करून महसूल विभागाची निष्क्रियता चव्हाट्यावर आणली असल्याने खबबळ उडाली आहे.
मंडळ अधिकारी, तलाठी विरोधात गावकर्यांचा संताप
काल सकाळी गावकर्यांनी नदीपात्रातुन होत असलेली वाहतूक बंद करण्यासाठी जेसीबी मशीन लावून खोदकाम सुरू केले तेव्हा गावकर्यांनी मंडळ अधिकारी तलाठी यांना बोलावले. जेव्हा हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा गावकर्यांनी महसूल प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. एकीकडे महसूल प्रशासन मृग गिळून बसून आहे तर गावकर्यांनी रस्ता बंद करून महसूल विभागाची निष्क्रियता चव्हाट्यावर आणली आहे. म्हणजे जे काम स्वत: प्रशासनाने करायला पाहिजे ते काम गावकर्यांना करावे लागत आहे.