लातूर (Zilla Parishad school) : शिरूर अनंतपाळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तळेगाव (बोरी) ची जिल्हा परिषद शाळा संपूर्णपणे पाण्यात बुडाली. सर्व वर्ग खोल्यात व व्हरांड्यात पाणी शिरले. अशा परिस्थितीत (Zilla Parishad school) शिक्षक व विद्यार्थी जीव मुठीत धरून घाबरलेल्या अवस्थेमध्ये जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते.
तळेगाव (बोरी)ची शाळा ही गावापासून बाहेर दूर असून आजूबाजूला उंच भाग व शेती आहे. शाळेला बांधकाम केलेली संरक्षण भिंत आहे. परंतु एका बाजूने पावसाचे शेतात पडलेले सगळे पाणी वाहून शाळेच्या मैदानामध्ये येते त्यामुळे मैदान तुडुंब भरून शाळेच्या व्हरंडयात व वर्गखोल्यात पाणी शिरले. हा प्रकार आत्ताच झाला नसून यापूर्वीही अनेकदा झालेला आहे.
देशाचे व गावचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम (Zilla Parishad school) जिल्हा परिषद शाळेमध्ये केले जाते केले जाते. परंतु अशा प्रकारच्या धोक्यामुळे विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा जीव धोक्यात येत असून शाळेच्या दुरुस्तीसाठी शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. शासनाकडून कसलाही निधी मिळत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी ग्रामपंचायत व गावातील नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याची पालकांमधून मागणी होत आहे.
सरपंचांनी लक्ष घालावे!
शाळेच्या आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे पाणी अडवून घ्यावे, अथवा ते शाळेच्या पाठीमागील बाजूने तात्काळ काढून द्यावे. या कामी सरपंचानी लक्ष घालावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो. असे केंद्रप्रमुख प्रभाकर हिप्परगे यांनी सांगितले.
शेतीतील येणारे पाणी बंद करू
शाळेच्या परिसरातील शेतकऱ्यांचे शाळेत येणारे पाणी बंद करण्याविषयी शेतकऱ्यांना विनंती केली असून ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय पाटील यांनी पाणी येण्याच्या मार्गावर लवकरच मुरूम खडक टाकून देतो म्हटले आहे, असे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंगद बनसोडे यांनी सांगितले.