सामान्य प्रशासन विभागाकडे कारवाईसाठी प्रस्ताव दाखल
यवतमाळ (Ladki Bahin Yojana) : शासकीय कर्मचार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्यास त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी महिला व बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आले होते.त्याधर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात अशा महिला कर्मचार्यांचा शोध प्रशासकीय यंत्रणेतून घेतल्या जात असून जिल्हा परिषदेतील एका नियमित महिला शासकीय कर्मचार्याने लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले असून सदर महिला कर्मचार्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जि.प. महिला व बालकल्याण विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात लोकप्रिय ठरलेली व निवडणुकीनंतर सातत्याने वादात असणारी (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजना अंतर्गत निश्चित केलेल्या निकषांचे पालन न करणार्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने मात्र सातत्याने सुरु आहे. यापूर्वी राज्यात पडताळणीमध्ये काही भावांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर काही शासकीय महिला कर्मचार्यांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे शासनाच्या निर्दशनास आले असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला त्यांच्या अधिनस्त कर्मचार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला का?
या बाबत चौकशी करण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण विभागाला दिलेले होते. त्यानुसार ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये पडताळणी केली असता,दोन कर्मचार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले. त्या एक शासकीय नियमित कर्मचारीही यवतमाळ पंचायत समितीमध्ये असून दुसरी कर्मचारी ही कंत्राटी स्वरुपाने कार्यरत आहे. कंत्राटी कर्मचारी कारवाईस पात्र ठरत नाही. यामुळे यवतमाळ पंचायत समितीअंतर्गत कार्यरत एका नियमित महिला कर्मचार्यावर कारवाईसाठी प्रस्ताव जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आला असून जिल्हातील महसूल,पोलिस व इतर शासकीय विभागातून कर्मचार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला की नाही,याबाबत माहिती प्राप्त झालेली नसल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले.
इतर विभागाकडून पडताळणीनंतरच्या माहितीची प्रतिक्षा: उप मुकाअ विशाल जाधव
जिल्हा परिषदअंतर्गत कर्मचार्यांनी (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला की नाही,याची पडताळणी पूर्ण झाली असून एक महिला कर्मचारीचे योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले.मात्र अजूनही महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन व इतर अन्य प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या विभागामध्ये कुठल्याही महिला कर्मचार्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला की नाही,याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आलेली नाही,त्यामुळे त्यांच्या माहितीची प्रतिक्षा असल्याचे प्रभारी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव यांनी देशोन्नतीला प्रतिक्रिया देताना सांगितले.