अलीकडच्या काळात भिकार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपणास दिसून येते. देशात लोकसंख्या वाढल्यामुळे भिकार्यांची संख्या वाढली असे वाटत असेल, तर ते चुकीचे आहे असे आम्हाला वाटते. भिकारी हा कोणत्या ना कोणत्या कुटुंबसंस्थेशी संबंधित व्यक्ती असतो. त्यामुळे तो ज्या कुटुंबाशी संबंधित आहे त्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी माणुसकी सोडल्यामुळे आणि स्वार्थी वृत्ती वाढल्यामुळे भिकार्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. अपंग, निराधार, निराश्रित अशा लोकांचा भीक मागणार्यांमध्ये सर्वाधिक समावेश असल्याचेही दिसून येते. मनोरुग्ण यांचाही भिकार्यांमध्ये समावेश दिसून येतो. भिकारी हा कोणत्याही एका जातीचा, धर्माचा नसून तो विविध जातींतील, विविध धर्मांतील असल्याचे आपणास दिसून येते. भिकारी का तयार होतात? त्या मागचे कारण काय? याचा विचार होणे आवश्यक आहे. भिकारी ज्या कुटुंबसंस्थेशी संबंधित असतो त्या कुटुंबाची मानसिकता समजून घ्यावी लागेल. ते कुटुंब त्या व्यक्तीला भिकारी होण्यासाठी कारणीभूत आहे का? याचाही बारकाईने विचार होणे आवश्यक आहे. अनेक वेळा असेही दिसून आले आहे, की काही माणसे त्या भिकार्याला एखाद्या विशिष्ट ठिकाणी आणून सोडतात. तो तिथे दिवसभर भिक्षा मागतो. त्याने दिवसभर मिळालेली भिक्षा घेऊन जाण्यासाठी सायंकाळी पुन्हा दुसरा व्यक्ती परत येतो. काही ठिकाणी तर रोजंदारीवर भिकारी काम करतात, अशी धक्कादायक बाब पुढे येते. काही ठिकाणी कुटुंबातील व्यक्तीलाच एखादा व्यक्ती घरात नकोसा असतो. अशा व्यक्तीलाही घरातून जेव्हा हाकलून दिले जाते किंवा कुटुंब संस्था त्या व्यक्तीच्या पाठीमागील आपला आधार काढून घेतात त्यावेळी त्या व्यक्तीला भिक्षा मागून खाण्यापलीकडे अन्य पर्याय नसल्याची त्याची मानसिकता होते. काहीजण ठरवून भिकारी होतात. हातपाय न मळता, कोणतेही कष्टाचे काम न करता दिवसभरात अगदी सहज चार- पाचशे रुपये हात पुढे करून भिक्षा मागून मिळत असतील तर काम कशाला करायचे, अशी मानसिकता झालेली माणसेही भिक्षा मागताना आढळतात.
अनेक हॉटेल, सिनेमागृह, गाव, शहराच्या चौकाचौकांत, बस स्थानक, रेल्वे स्थानक, धार्मिक स्थळाच्या समोर तर भिकार्यांची प्रचंड वर्दळ असते. मग या भिकार्यांकडे आपण जेव्हा रुपया देत असतो, आपल्या पद्धतीने दान करत असतो, त्यांना मदत करत असतो, तेव्हा तो खरेच भिकारी आहे का किंवा असेल का, असा प्रश्न आपल्या मनाला पडला पाहिजे. अडचणीत असणार्यांना किंवा भिकार्याला दान करू नये, मदत करू नये या मताचे आम्ही निश्चितपणे नाही; परंतु ज्यांनी आपल्या आई- वडिलांना, बहिणीला, पत्नीला, मुलांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर सोडले आहे त्या व्यक्तींच्या मानसिकतेचा अधिक विचार करणे काळाची गरज आहे. बर्याचदा आम्ही जेव्हा भिकार्यांशी संवाद साधतो, तुम्ही भिक्षा का मागता, अशी जेव्हा चर्चा होते तेव्हा मिळालेली माहिती अत्यंत धक्कादायक अशी असते- ’मला दोन मुलं आहेत. एक मुलगी आहे. त्यातील एक नोकरीला आहे. सूनबाई उच्चशिक्षित आहे; परंतु सुनेला घरात सासू-सासरे चालत नाहीत. अशावेळी वेगळे राहून पुन्हा संसार उभा करण्याची ताकद हातापायात उरलेली नाही. त्यामुळे नाईलाज असतो. जगावे लागते म्हणून हॉटेल समोर, एखाद्या मंदिर, मस्जिदी समोर बसून किंवा बस स्थानक, रेल्वे स्थानकासमोर बसून भिक्षा मागावी लागते. साहेब, भीक मागण्याची आम्हाला काही हौस नाही; मात्र देवाने पोट दिले तर जगावे कसे हा प्रश्न पुढे आहे. म्हणून हात पुढे करावे लागतात. मरावे वाटत नाही. मरणाची भीती वाटते. म्हणूनच जगावे लागते.’ अशी धक्कादायक माहिती पुढे येते. ज्यांनी आपले आई- वडील अथवा कुटुंबातील व्यक्तीला भिकेला लावले असेल, तर भविष्यात आपल्यासोबत असेच घडले तर काय होईल याचा विचार करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या ठिकाणी आपल्या पाहण्यातील भिकारी भेटला, आपल्या नात्यातला भिकारी भेटला, तर आपल्या काळजाला चर्र झाले नसेल, तर आपण माणूस म्हणून जगत आहोत का? किंवा माणुसकी हरवत चालली, असे समजावे लागेल. जर आपल्या नात्यातील, पाहण्यातील, ओळखीतील एखादा अधिकारी, कर्मचारी भेटला, तर आपणास अभिमान वाटतो. त्याचा गर्व वाटतो. आपण त्याच्याबद्दल सार्वजनिक जीवनात चर्चा करत असतो तद्वतच आपल्या गाव, नगराच्या परिसरातील भिकारी भेटला, तर त्याला त्याच्या घरी परत पाठवता येते का? त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करता येते? ते लोक ऐकत नसतील, तर त्याच्या कुटुंबीयांना कायद्याच्या चौकटीत बसवून, त्यांना समजावून सांगून, की कुटुंबातील एका सदस्याला आपण भीक मागण्यासाठी रस्त्यावर पाठवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवून आपल्या कुटुंबाची पत प्रतिष्ठा मातीत घालवत आहोत, याची जाणीव करून देणारी पिढी आता पुढे येण्याची गरज आहे.
कुटुंबाने, समाजाने आणि प्रशासनाने प्रयत्न करूनही एखादा भिकारी जर सामाजिक दृष्ट्या सुधारत नसेल, तर त्याला एखाद्या अनाथाश्रमात, सुधारगृहात भरती करून सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. खरेतर आपले आई- वडील, आपल्या नात्यातील एखादी व्यक्ती भीक मागून जगत असेल, तर आपण खर्या अर्थाने भिकारी आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे, तसेच प्रेम, आदर, माणुसकी, आतिथ्य, ह्याला जीवनात स्थान दिले पाहिजे. माणुसकीने सर्व नातेसंबंध जपले पाहिजे.
राम तरटे
८६००८५२१८३
email: tarteram12@gamil.com