महाराष्ट्रातील निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडले असले तरी युती आणि आघाडीतील दुसर्या-तिसर्या फळीतील नेत्यांची, कार्यकर्त्यांची राजी-नाराजी अजूनही सुरूच असल्याचे दिसते. पहिल्या दोन टप्प्यामध्ये या राजी-नाराजीचा फारसा परिणाम जाणवला नाही; परंतु राजकीयदृष्ट्या अधिक संवेदनशील मानल्या जाणार्या प.महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई-ठाणे भागात होणार्या उर्वरित तीन टप्प्यातील मतदानापूर्वी आघाडी-युतीच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी अजूनही प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसते. पुण्याचे शिंदेसेनेच शहरप्रमुख आपल्याच नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे, तिकडे ठाण्यात तर भाजप नेत्यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचे कामच करायचे नाही, असे ठरविल्याचे दिसते. ठाण्यासाठी भाजपचे संजीव नाईक इच्छुक होते आणि पक्षाच्या सूचनेवरूनच त्यांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली होती; परंतु अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदेंनी ठाणे आपल्याकडे खेचून घेतले. त्यामुळे नवी मुंबई परिसरात चांगलाच प्रभाव असलेले नाईक कुटुंबीय दुखावले गेले आहेत. आता त्यांची समजूत काढण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मेहनत घ्यावी लागेल.
तिकडे नगरमध्ये माजी आमदार विजय औटी यांनी ऐनवेळी भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर करीत शरद पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या या जागेवर आघाडीची डोकेदुखी वाढविली आहे. डहाणू, पालघरमध्येही आघाडीतीलच मित्र पक्षांच्या भूमिकेमुळे आघाडीच्या उमेदवारांची अडचण होत आहे. मुंबईतदेखील वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर नसिमखान, भाई जगताप वगैरे नेत्यांनी नाराजी जाहीर केली. ऐन निवडणुकीच्या वेळी आपल्याच नेत्यांना कोंडीत पकडणार्या या स्थानिक नेत्यांची समजूत काढणे आघाडी आणि युतीच्या नेत्यांना खूप जड जात आहे. युतीच्या नेत्यांनी काही बड्या नाराजांची समजूत काढण्यासाठी विधानपरिषदेचे गाजर समोर केल्याचे समजते, आघाडीच्या नेत्यांकडे तेही गाजर उपलब्ध नाही. अर्थात नेते काही वेगळी भूमिका घेत असले तरी मतदार त्यांच्या मागे जातीलच असे नाही. मतदार आपल्या विवेकानुसारच मतदान करणार आहेत; परंतु अशा राजी-नाराजीतून जे चित्र समोर येते त्यामुळे उमेदवाराच्या विजयाबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम मतदारांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळेच नाराजांची समजूत काढणे हा एक मोठा टास्कच नेत्यांपुढे आहे.