हिंगोली (Hingoli) :- ॲग्री स्टॅग योजनेत जिल्ह्यात 3 लाख 63 हजार 990 खातेदार असून आतापर्यंत 1 लाख 35 हजार 50 खातेदारांनी फार्मर आयडी तयार केले आहेत. त्याची टक्केवारी 37 टक्के एवढी आहे. तालुकानिहाय फार्मर आयडी तयार केलेल्या शेतकरी खातेदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. हिंगोली तालुक्यात 22 हजार 389, सेनगाव 27 हजार 899, वसमत 34 हजार 665, औंढा नागनाथ 23 हजार 44 आणि कळमनुरी तालुक्यातील 27 हजार 53 खातेदारांनी फार्मर आयडी काढली आहे. एकही शेतकरी (farmer)वंचित राहू नये यासाठी सध्या प्रत्येक गावांमध्ये विशेष शिबिरे घेऊन तसेच सीएससी केंद्रामार्फत फार्मर आयडी काढण्याचे काम जलदगतीने सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील शिबिरामध्ये सहभागी होऊन तसेच नजीकच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन ॲग्रीस्टॅक फार्मर(Agristack Farmer) आयडी काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ॲग्रीस्टॅक कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा पाया
शेतकऱ्यांना अधिक समृध्द आणि सशक्त बनविण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी माहिती संच, हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मिती म्हणजेच ॲग्रीस्टॅक या संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ॲग्रीस्टॅक हा उपक्रम कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारा असून कृषी क्षेत्राच्या प्रगतीचा पाया आहे. कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 पासून महाराष्ट्रासह देशातील 24 राज्यांमध्ये ‘अँग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे ॲग्रीस्टॅक ?
ॲग्रीस्टॅक ही एक अशी क्रांतिकारक संकल्पना आहे, जी शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते. शेतकरी व त्यांच्या जमिनी, शेतात घेतलेली हंगामी पिके आणि त्यांच्या शेताचे भौगोलिक स्थान ही माहिती एकत्र करुन कृषी विषयक इतर संसाधनांचा वापर योग्य रितीने करणे व आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासन (State Govt) पुरस्कृत पारदर्शक प्रणाली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांची ओळख (फार्मर आयडी) निश्चित केली जाते. यामधून शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते.
ॲग्रीस्टॅकमुळे होणारे फायदे
डिजिटल सेवा अंतर्गत पीएम किसान डीबीटी लाभ, डिजिटल पीक कर्ज, पीक विमा, एमएसपी लाभ आदी सेवा मिळणार आहेत, तर माहिती सेवांतर्गत हवामान सूचना, पीक सल्ला, मृदा आरोग्य माहिती, बाजारभाव माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. याशिवाय हंगामी पिके, भू-शास्त्रीय माहिती आणि अन्य महत्त्वाचे डेटा गोळा करून त्यांचे सतत अद्ययावतीकरण करणे, कृषी कर्ज आणि विमा सेवांचा लाभ सहज मिळवून देणे, किमान आधारभूत किंमत व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे शेतमाल खरेदी प्रक्रिया सुलभ करणे, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी कृषी क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला गती देणे आणि नावीन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हादेखील ‘अँग्रीस्टॅक’ योजना राबविण्यामागील उद्देश आहे.
ऑनलाइन करा अर्ज
‘अँग्रीस्टॅक’ योजनेत ओळखपत्रासाठी शेतकऱ्यांना सीएससी केंद्र, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत https://mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल. ज्यांना ऑनलाईन (Online)प्रक्रिया अवघड वाटत असेल, त्यांच्यासाठी गावपातळीवर महसूल विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेत शेतकऱ्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या सातबारा उताऱ्याबरोबर जोडण्यात येऊन त्यांची ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत मोफत नोंदणी करण्यात येत आहे. आजच आपला फॉर्मर आयडी काढून कृषी क्रांतीतील भागीदार व्हावे. आपणास अजूनही फार्मर आयडी आणि ॲग्रीस्टॅक संकल्पनेविषयी माहिती नसल्यास आजच आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहायक यांच्याशी व हेल्पलाईन क्रमांक : 020-25712712 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




