हिंगोली(Hingoli):- वसमत जिजामातानगर भागातील ४४ वर्षीय एका व्यक्तीला कमी दरात सोने (Gold) देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून १५ लाख रूपये घेऊन ते परत न करता मानसिक छळ (mental torture) करून दमदाटी केल्याने त्या त्रासाला कंटाळून सदर व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याप्रकरणी चौघांवर वसमत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमी दरात सोने देण्याचे दाखविले आमिष
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसमत शहरातील जिजामाता नगर उत्तम रामराव कड यांना सुनिता कातोरे, सूर्यकांता कातोरे व रमाकांत कातोरे या तिघांनी कमी भावात सोने देतो, असे त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून १५ लाख रूपये घेतले होते. हे सोने घेण्याकरीता कड यांनी कातोरे यांच्याकडून वेळोवेळी मागणी केली असता टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे सोने नको माझी रक्कम मला परत द्यावी अशी मागणी संतोषने केली असता पैसे देण्याकरीता कातोरे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. तसेच वसमत शहरातील संजय काकडे व हनुमंत भालेराव यांच्यासोबत घर विक्रीचा करार केला होता. या करारनाम्या नुसार ६ लाख रूपये देणे अपेक्षित होते. या रकमेबाबत दोघांकडे विचारणा केली असता त्यांनीही उडवा उडवीची उत्तरे देऊन दमदाटी करून मानसिक छळ केला जात होता.
वसमत शहर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल
या त्रासाला कंटाळून संतोष रामराव कड (४४) याने १० डिसेंबर रोजी रात्री ८ ते ८.३० दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या(Suicide) केली. याप्रकरणी मयताचा भाऊ उत्तम रामराव कड यांनी १३ डिसेंबर रोजी वसमत शहर पोलिसात रितसर तक्रार दिली. ज्यामध्ये संतोष कड यांच्याकडून १५ लाख रूपये घेऊन सोने व पैसे परत न देता तसेच घर विक्री करारनाम्यातील ६ लाख रूपये परत न केल्याने या त्रासाला कंटाळून संतोष याने आत्महत्या केली. या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुनिता सूर्यकांत कातोरे, सूर्यकांत माणिकराव कातोरे, रमाकांत माणिकराव कातोरे, संजय संभाजी काकडे, हनुमंत माधवराव भालेराव रा.वसमत या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कसबेवाड हे करीत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुसूदन केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाजन यांनी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेतली.




 
			

