१२ हजार २२५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकला पहिला हप्ता
– नरेश बावणे
गडचिरोली (PM Awas Yojana) : सर्वासाठी घरे या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातील १७ हजार ४२८ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी चालु आर्थिक वर्षाकरीता १८ हजार १५७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात १७४२८ लाभार्थ्यांना मंजुरी प्रदान करण्यात आली असून १२२२५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता टाकण्यात आला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ग्रामीण, १ एप्रिल २०१६ रोजी सुरू करण्यात आली, हा भारत सरकारचा ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत एक प्रमुख उपक्रम आहे. सर्व बेघर कुटुंबांना आणि ग्रामीण भागातील अस्थिर आणि जीर्ण घरांमध्ये राहणाऱ्यांना मूलभूत सुविधांसह एक निश्चित घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. देशभरातील ग्रामीण भागातील १ कोटी कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यासाठी १८१५७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये अहेरी तालुक्यास २१९५, आरमोरी ९८८, भामरागड ३३७, चामोर्शी २२०६, देसाईगंज ४६४, धानोरा २८९३, एटापल्ली १३८९, गडचिरोली १३५६, कोरची १३४३, कुरखेडा २९४३, मुलचेरा ५२३ तसेच सिरोंचा तालुक्यासाठी १५२० घरकुलांचे लक्ष्य देण्यात आले होते. प्रत्येक्षात १७४२८ घरकुले मंजुर करण्यात आली. शासनाच्यावतीने (PM Awas Yojana) घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना चार टप्प्यात १ लाख २० हजार रूपयांचा निधी दिला जात असतो. यामध्ये पहिला हप्ता १५ हजार, दुसरा हप्ता ७० हजार, तिसरा हप्ता ३० हजार तर चौथ्या हप्त्यात ५ हजार रूपये दिले जात असतात.
२०२४-२५ या वर्षात घरकुले मंजुर करण्यात आल्यानंतर ज्या लाभार्थ्यांनी प्रक्रिया पुर्ण केली अशा १२२२५ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ८०६, आरमोरी ८२०, भामरागड २४९, चामोर्शी १६७६, देसाईगंज ४०९, धानोरा १३८३, एटापल्ली ७०६, गडचिरोली ११४९, कोरची ११४१, कुरखेडा २३३८, मुलचेरा ४४३ तसेच सिरोंचा तालुक्यातील ११३५ घरकुल लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे कार्यवाहीस विलंब
राज्यात एप्रिल महिण्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता होती. यानंतर ऑक्टोबर महिण्यात पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिला लागु झाली. सबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. त्यामुळे प्रशासकीय कार्यवाहीस विलंब झाल्याचे बोलल्या जात आहे.
वाढत्या महागाईचा घरकुल बांधकामास फटका
२०२४-२५ या आर्थिक वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PM Awas Yojana) पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता टाकण्यात आला असला तरी वाढत्या महागाईचा घरकुल बांधकामास फटका बसल्याचे बोलल्या जात आहे. बऱ्याच लाभार्थ्यांनी अद्यापही घरकुल बांधकामास प्रारंभ केला नाही. रेती, सिमेंट, गिट्टी, लोखंड आदी वस्तुंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने बांधकामाचे नियोजन करतांना अडचणी येत असल्याचे बोलल्या जात आहे. अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे.