Yawatmal :- इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) यांच्यामार्फत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) बंगळुरू येथे भेट देऊन संशोधनाची संधी देण्याकरिता झालेल्या राज्यस्तरीय परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.
कल्याणी, ईश्वरी आणि मयुरीने मिळविला अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि चतुर्थ क्रमांक
कळंब तालुक्यातील शिवपुरी येथील स्व. संगडाजी नाईक वि.जा.भ.ज.आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. या शाळेतील अकराव्या वर्गातील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कल्याणी सखाराम राठोड हिने ७२ गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर ईश्वरी कैलास जाधव हिने ७० गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला. बारावी इयत्तेतील विज्ञान शाखेची विद्यार्थिनी मयुरी देवेंद्र राठोड हिने ६० गुण मिळवून चतुर्थ क्रमांक मिळवला. रविवार, २७ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेत जिल्ह्यातून एकूण ५५७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अमरावती विभागातून १६ विद्यार्थी इस्रो भेटीसाठी निवडले गेले. त्यातील पहिल्या तीन विद्यार्थिनी शिवपुरी आश्रमशाळेतील आहेत, हे विशेष. या विद्यार्थिनींच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO)संस्थेला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
या विद्यार्थिनींना शाळेतील मुख्याध्यापक प्रा. अविनाश चव्हाण, कैलास जाधव, प्रा. प्रकाश राठोड, प्रा. प्रवीण किन्हेकार, प्रा. दिनेश आडे, प्रा. अरुणा गेडाम, प्रा. प्रेम चव्हाण, प्रा. अक्षय राठोड, दिलीप राठोड, संदीप राठोड मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष दुलीचंद राठोड, सचिव शीतल राठोड तसेच पालक व शिक्षकवृंदाने अभिनंदन केले. संस्थेचे संस्थापक संजय राठोड यांनीही यशस्वी विद्यार्थिनी व शिक्षकांचे कौतुक केले आहे.