आष्टी (Gadchiroli) :- बाभळीच्या झाडावर वीज (Electricity) कोसळल्याने त्या झाडाखाली आश्रयास असलेल्या ९ शेळ्या ठार झाल्याची घटना सायंकाळी ३ ते ४ वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ईल्लूर येथे घडली. यामुळे शेळी मालकावर आर्थिक संकट कोसळले आहे.
शेळी मालकावर आर्थिक संकट कोसळले
काल २१ मे रोजी चामोर्शी तालुक्यातील आष्टी परीसरास अवकाळी पावसाने झोडपून काढले. आष्टी नजीकच्या ठाकरी येथील नागरीकांच्या शेळया ईल्लूर जंगल परीसरात चरण्यासाठी गेल्या होत्या. अचानक अवकाळी पावसास प्रारंभ झाल्याने शेळया बाभळीच्या झाडाखाली आश्रयास थांबल्या होत्या. दरम्यान बाभळीच्या झाडावर विज कोसळली. यामुळे त्या झाडाखाली आश्रयास थांबलेल्या ९ शेळयाही जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती महसूल अधिकार्यांना (Revenue officers) मिळताच तलाठी सचीन गुरनुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशू वैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करून पंचनामा करण्यात आला. नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे. ठार झालेल्या बकर्यामध्ये ठाकरी येथील राजन्ना पेरमवार यांच्या चार, राजू जिल्लेवार यांची एक, सदाशीव बोलगोडवार यांच्या दोन तसेच बाबुराव वर्धलवार यांच्या दोन बकर्यांचा समावेश आहे.शेळी मालकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.



 
			 
		

