Parbhani :- परभणीच्या सेलू तालुक्यातील हादगाव पावडे येथील एका ५५ वर्षीय शेतकऱ्यांने सततची नापीकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतातील शेळीच्या गोठ्यात असलेल्या लाकडी अडूला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील हदगाव पावडे येथील शेतकरी बाबासाहेब नारायण शेवाळे वय ५५ वर्षे यांना एक हेक्टर सात आर जमीन असून भारतीय स्टेट बँक (State Bank of India) शाखा सेलूचे २ लाख ५० हजार रुपये कर्ज होते.
दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या
सततची नापिकी आणि बँकेचे थकीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत हदगाव खुर्द शिवारातील गट क्रमांक १२१ मध्ये असलेल्या शेळीच्या गोठ्यात लाकडी अडूला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचे २७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता उघडकीस आले. घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी, पोलीस नायक माधव कांगणे, हातगाव पावडे येथील पोलीस पाटील मंगल भागवत पावडे, यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय लोया यांनी शवविछेदन (Autopsy) केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. रात्री त्यांच्या पार्थिवावर हादगाव पावडे येथे अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले.
अनिल बाबासाहेब शेवाळे याने दिलेल्या खबरे वरून कलम १९४ अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत.दरम्यान मयत बाबासाहेब शेवाळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. शेतकऱ्यांच्या पवित्र सण गुढीपाडवा काही दिवसांवर असताना नापीकी मुळे शेतकऱ्यास आत्महत्या करावी लागली यामुळे हादगाव पावडे सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.