Parbhani :- परभणीच्या पाथरी तालुक्यात २१ व २२ जुलैच्या रात्री पाथरी विधानसभा मतदारसंघातील (Assembly constituencies) अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले. काही भागात घरात पाणी शिरले, बांध फुटल्याने शेती खरडून गेली असून शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजेश विटेकर यांनी आज सकाळी सोनपेठ व पाथरी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघात पावसाचे थैमान
अतिवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तहसीलदार सुनील कावरखे व पाथरीचे तहसीलदार शंकर हांदेश्वार इतर अधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीसाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली. सोनपेठ महसूल मंडळात १३६ मिमी, पाथरी तालुक्यातील हादगावमध्ये १०६ मिमी, कासापुरीत २१५ मिमी, बाभळगाव व केकरजवळा येथे प्रत्येकी ९८ मिमी इतका मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. पाथरी तालुक्यातील हादगाव येथील इंदिरानगर भागात घरात पाणी शिरल्याने अनेक कुटुंबीयांचे संसार उपयोगी साहित्य व घरांचे नुकसान झाले. दुपारी आमदार विटेकर यांनी कासापुरी, पाथरगव्हाण ,वडी येथे भेट दिली. त्यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, कृरबासचे सभापती अनिल नखाते, अजिंक्य नखाते, तहसीलदार शंकर हांदेश्वर, पोलीस निरीक्षक महेश लांडगे हे उपस्थित होते. आ. विटेकर यांनी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातील शेती, घरे यांचे तातडीने पंचनामे करून शासकीय मदत देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.