हिंगोली(Hingoli):- नाशिक येथून हिंगोलीत कामानिमित्त आलेला तरूण अभियंता बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. या दरम्यान २३ ऑगस्ट रोजी पारोळा तलावात तरूण अभियंत्याचा मृतदेह (dead body) आढळून आला.
पारोळा तलावात आढळला मृतदेह
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाशिक यशोदानगर पेठरोड भागातील तरूण अभियंता देवंद्र प्रकाश बुरूड (३१) हा २१ ऑगस्टला सकाळी नाशिक येथून हिंगोलीत कामासाठी आला होता. हिंगोली शहरातील एका लॉजमध्ये खोली घेऊन तेथेच मुक्काम ठोकला होता. २२ ऑगस्ट गुरूवार रोजी सकाळच्या सुमारास त्याने एक ऑटो ठरवून हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील पारोळा फाटा येथे गेला होता. सदर ठिकाणी ऑटो चालकास काही वेळ थांबण्याचे सांगितले. बराच वेळ होऊनही देवेंद्र परत आला नाही. काही वेळानंतर त्याच्या नातेवाईकांनी देवेंद्रच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल (Mobile) स्वीचऑफ आढळून आल्याने नातेवाईकांचा संशय बळावला. त्यांनी तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ज्या ऑटो चालकाने देवेंद्रला पारोळा पाटीवर नेवून सोडले त्याचा शोध घेऊन चौकशी केला.
हिंगोली ग्रामीण पोलिसात नोंद
परंतु ऑटो चालकाने देवेंद्रला पारोळा पाटीवर सोडल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी लॉजवरील खोलीत पाहणी केली असता त्याचा शर्ट पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. यावरून देवेंद्रने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. हिंगोली ग्रामीण पोलिसांसह सायबर सेलचे सपोनि शिवसांब घेवारे यांनी शोधमोहीम सुरूच ठेवली. या दरम्यान २३ ऑगस्ट रोजी ११.३० वाजता देवेंद्रचा मृतदेह पारोळा तलावात मिळून आला. या प्रकरणात दिनेश बुरूड याने २३ ऑगस्टला हिंगोली ग्रामीण पोलिसात दिलेल्या जवाबात देवेंद्र बुरूड याचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आकाश पंडितकर करीत आहेत.




