हिंगणघाट (Minor Girl Abduction) : हिंगणघाट पोलिसांनी अत्यंत शिताफीने अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणी आरोपीला पुणे येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. पोलीस स्टेशन हिंगणघाटमध्ये दिलेल्या तोंडी तक्रारीत मुलीचे वडील म्हणाले की, त्यांची अंदाजे १७ वर्ष वयाची मुलगी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेली होती. (Minor Girl Abduction) तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंदवून तपास सुरू झाला.
गुन्ह्यात पीडित मुलगी व आरोपी यांचा शोध लागल्यानंतर, प्रकरण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासादरम्यान खात्रीशीर मुखबिरांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल अशोक कन्नाके (वय २१, रा. कुकाबर्डी, हिंगणघाट) पुणे येथे असल्याचे समोर आले.
पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपीला हडपसर, पुणे येथून ताब्यात घेतले. (Minor Girl Abduction) पीडित मुलीबाबत विचारपूस केल्यावर तीही आरोपीसोबत राहत असल्याचे समोर आले आणि मुलीला सुरक्षित हडपसर, पुणे येथून पोलीस ताब्यात घेतले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट करत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. सुभाष राऊत, दिवाकर परिमल, पोहवा संजय राठोड, नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे, तसेच सायबर सेल येथील मिना कौरती, अक्षय राऊत आणि गोविंद मुंडे यांनी केली.