लातूर (Latur) :- लातूर विभागातील लातूर, धाराशिव व नांदेड या जिल्ह्यांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिलेल्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय (higher secondary school) व कनिष्ठ महाविद्यालयांवर 15 दिवसांत दंडात्मक कारवाई करावी व या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही.एम. भोसले यांनी लातूरच्या शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याची शिक्षण उपसंचालकांकडे मागणी
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर विभागांमध्ये लातूरसह धाराशिव व नांदेड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांनी 2024-25 या शैक्षणिक वर्षात आपल्या मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. व्ही. एम. भोसले यांनी याबाबत संबंधित कार्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली प्रवेशा बाबतची माहिती मागून घेतली. त्यात लातूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांसह नामांकित उच्च माध्यमिक विद्यालये, धाराशिव व नांदेड या जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालयांसह नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयांनी आपल्या मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. शासकीय नियम डावलून हे प्रवेश देण्यात आले. यातून विद्यार्थी व पालकांची आर्थिक लुटमार करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात संस्थाचालक, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी राजरोसपणे गोरख धंदा या माध्यमातून चालविल्याचा आरोप भोसले यांनी या निवेदनात केला आहे.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल तात्काळ घ्यावी व मूळ प्रवेश क्षमतेपेक्षा जादा प्रवेश तात्काळ रद्द करावे. या प्रकरणात दोषी असलेल्या संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व सर्व संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून 15 दिवसांत कठोर कारवाई करावी, अशी मागणी भोसले यांनी निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे शिक्षण प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, विभागीय सचिव तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांनाही देण्यात आल्या आहेत.