ॲड. शरद राखोंडे ठरले फुल आयर्नमॅन
पूर्ण केली जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन स्पर्धा!
बुलढाणा (Adv. Sharad Rakhonde) : जिल्ह्याच्या इतिहासात एक सुवर्णाक्षरांनी कोरली जाणारी कामगिरी, जिल्हा काँग्रेसचे सचिव, प्रसिद्ध विधिज्ञ आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते असलेल्या ॲड. शरद ल. राखोंडे (Adv. Sharad Rakhonde) यांनी साऊथ कोरिया येथे नुकत्याच पार पडलेल्या Full Ironman Triathlon स्पर्धेत यशस्वी सहभाग नोंदवला असून, ही स्पर्धा 14 तास 38 मिनिटांत पूर्ण करत ते जिल्ह्यातील पहिले Full Ironman ठरले आहेत.
ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन पैकी एक मानली जाते, ज्यात 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42.2 किमी मॅरेथॉन हे तीन कठीण टप्पे सलग एकाच दिवशी पूर्ण करावे लागतात. हे केवळ शारीरिकच नव्हे, तर प्रचंड मानसिक क्षमता आणि आत्मशिस्त यांची कसोटी असते. ॲड. राखोंडे (Adv. Sharad Rakhonde) हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून सक्रिय असून, जिल्ह्यातील अनेक नामांकित पतसंस्थांच्या संचालक मंडळावर म्हणूनही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. याचबरोबर, ‘महात्मा फुले मंडळा’च्या माध्यमातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, महिला सक्षमीकरणासाठी कार्यशाळा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि सामाजिक जनजागृती मोहिमा हे त्यांच्या उपक्रमांचा भाग आहेत.
आयर्नमॅन स्पर्धा ही जरी त्यांची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कामगिरी असली, तरीही शरद राखोंडे (Adv. Sharad Rakhonde) यांनी यापूर्वीही विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांचे हे यश म्हणजे दीर्घकालीन परिश्रम, कठोर प्रशिक्षण आणि न थांबणाऱ्या जिद्दीचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक यशामुळे (Buldhana District) बुलढाणा जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.