परभणी/मानवत (Parbhani) :- देशोन्नती वृत्तसंकलन तालुक्यातील मानवत ते पाळोदी या १२ कि.मी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे (Poor quality) होत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आंदोलक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग(Department of Public Works) यांच्यात बैठक घेऊन एक महिन्याच्या आत एक बाजू पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्यानंतर नियोजित रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
परभणीच्या मानवत तहसीलदारांच्या दालनात घेण्यात आली बैठक ..!
मानवत ते पाळोदी या १२ कि.मी.रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून रस्ता साईड ने कुठे सहा इंच तर कुठे फुट भर खोद काम करून गिट्टी टाकत आहेत त्यावर मुरूम नाही, पाणी नाही रोलिंग सुद्धा केली जात नाही त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे गिट्टी पाहून त्यावर मोटरसायकल स्लीप होऊन अनेकांचे अपघात झाले आहेत. यावर अनेक तक्रारी झाल्या तरी ठेकेदार यांना काहीच फरक पडत नव्हता. परिणामी या रस्त्यावरील गावातील ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी ग्रामस्थ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास लव्हेकर यांच्यात मानवत तहसीलदार यांच्या दालनात बैठक घेण्यात आली बैठक संपल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी केली.
रस्त्याच्या एक बाजुचे काम एका महिन्यात पुर्णपणे करून वाहतुकीस योग्य करुन देण्याचे आश्वासन
रस्त्याच्या एक बाजुचे काम एका महिन्यात पुर्णपणे करून वाहतुकीस योग्य करुन देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास लव्हेकर यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा व ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे तालुकाध्यक्ष नामदेव काळे, गोपाळ काळे, सावळीचे सरपंच माणिकराव काळे, हातलवाडीचे सरपंच तथा बाजार समितीचे संचालक कृष्णा शिंदे, लक्ष्मणराव शिंदे, विठ्ठल चोखट, दत्ता परांडे, महादेव काळे, विठ्ठल काळे, रंजित चव्हाण, किशनराव शिंदे, अशोक कदम, अशोक काळे, उद्धवराव काळे बाबा शिंदे, माणिक चोखट,बळीराम पतंगे यांचा सह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते




