परभणी(Parbhani) :- कृषी विभाग (Department of Agriculture) प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन व संजीवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत रोडवरील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी संजीवनी महोत्सव होणार आहे. १४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पत्रकार परिषद घेत दिली जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती
या महोत्सवात सहा दालन असून २०० स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी (Farmers)स्टॉल, सजीव नमुने, प्रात्याक्षिक, पशु प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, कृषी विषयक परिसंवाद, यशस्वी शेतकरी संवाद, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृषी विषयक तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रुंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्यान यांच्या माध्यमातून विचारांची देवाण – घेवाण करुन समस्या निराकरण करणे या प्रमुख व इतर उद्दिष्टांना समोर ठेवून कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी बांधवांनी फुले, फळे, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य इत्यादीचे जिवंत नमुने प्रदर्शनात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनात सहभागी शेतकरी, पशुपालक यांच्यामधून विविध पुरस्कार काढण्यात येणार आहेत.