त्रुटी आढळलेल्या केंद्रांना कारणे दाखवा नोटिस!
परभणी (Agriculture Centre) : परभणीत खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणी सुरू झाल्याने सध्या शेतकऱ्यांकडून खते आणि बियाण्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे कृषी केंद्रांवर (Agricultural Centers) शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही कृषी केंद्र धारकांकडून (Agriculture Center Holder) शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाकडून (Administration) तपासणी मोहीम राबविण्यात आली. शनिवार 14 जून रोजी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने परभणीतील पाथरी शहरातील 5 कृषी केंद्रांची तपासणी केली. यावेळी काही केंद्रांवर नियमबाह्य बाबी आढळून आल्या असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तसेच एकूण 200 बॅग खत विक्रीस बंदी घालण्यात आली असून, त्यांची एकूण किंमत 6 लाख रुपये इतकी आहे.
कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन!
भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी कृषी केंद्र चालकांना इशारा दिला की, पुढील काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास यापेक्षा कठोर कारवाई (Strict Action) करण्यात येईल. या तपासणी पथकात जिल्हा कृषी अधिकारी परभणी, डी. एस. चव्हाण, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जी. बी. दहिवडे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोविंद काळे आणि विस्तार अधिकारी कृषी संदिपान घुंबरे यांचा समावेश होता. शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची खरेदी करताना पक्की रोख पावती घेणे, खरेदीचे प्रमाण व दर तपासणे आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक झाल्यास कृषी विभागाकडे त्वरित तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने (Department of Agriculture) केले आहे.