मुंबई येथे झाली बैठक; आघाडी करण्यावर झाली चर्चा
परभणी (Sharad Pawar Election) : येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या की आघाडी करून यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख शरद पवार यांनी परभणी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. बैठकीला परभणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित असताना झालेल्या चर्चेत स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar Election) वतीने राज्यातील जिल्हानिहाय पदाधिकार्यांच्या बैठका घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काय करायला पाहिजे याचा आढावा घेतला. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडीवर राहिलेला आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी का यावर चर्चा झाली. किंवा महाविकास आघाडीतील इतर पक्षा सोबत युती करून निवडणूक लढवल्यास काय फायदा होईल, यावर चर्चा करण्यात आली.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, खा. फौजिया खान, माजी मंत्री राजेश टोपे, परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष रितेश काळे, शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल माजीद व इतर पदाधिकार्यांची उपस्थिती होती. ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांनी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेतील जागांचा आढावा पक्षासमोर ठेवला.
येणार्या काळात काय परिस्थिती राहू शकते याची माहिती देखील गव्हाणे यांनी दिली. तर रितेश काळे यांनी महाविकास आघाडी सोबत चर्चा करून जागावाटप बाबत योग्य निर्णय घेतल्यास फायदा होईल, असे मत मांडले. बैठकीअंती स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे ठरले.




