प्राचार्य डॉ नंदकिशोर ठाकरे व ठाणेदार पोहेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन!
मानोरा (Anti-Ragging Guidance) : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै. पांडुरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा येथे अँटी रॅगिंग मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमधील संवाद, परस्पर सन्मान आणि सकारात्मक नाते हीच खरी महाविद्यालयीन संस्कृती!
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मानोरा पोलीस स्टेशनच्या (Manora Police Station) पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ठाणेदार मॅडम पोहेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रॅगिंगची संकल्पना, त्याचे मानसिक, शारीरिक व सामाजिक परिणाम तसेच भारतीय कायद्यानुसार रॅगिंग हा गंभीर दंडनीय गुन्हा असल्याची जाणीव करून दिली. विद्यार्थ्यांनी एकमेकांशी मैत्रीपूर्ण, आदरयुक्त व सहकार्यात्मक वर्तन ठेवून सुरक्षित व सुसंवादी वातावरण निर्माण करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच रॅगिंगमुळे होणारे नकारात्मक परिणाम, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम, याची उदाहरणांसहित माहिती त्यांनी दिली. “विद्यार्थ्यांमधील संवाद, परस्पर सन्मान आणि सकारात्मक नाते हीच खरी महाविद्यालयीन संस्कृती आहे. रॅगिंग विरोधी भूमिका ही प्रत्येक विद्यार्थ्याची सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रॅगिंग विरोधी शपथ घेतली. महाविद्यालय परिसरात रॅगिंग विरोधी फलक, घोषवाक्ये आणि जनजागृती साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी रॅगिंगला पूर्णतः नकार देत परस्पर सहकार्य, सन्मान व मैत्रीपूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित!
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या वतीने करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. किशोर कोपरकर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल ढवळे यांनी विशेष मेहनत घेतली. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी (Students) या कार्यक्रमातून अँटी रॅगिंग विषयक कायदेशीर माहिती, जबाबदाऱ्या तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीबाबत प्रेरणादायी संदेश घेतला.




